Uncategorized

भामरागडच्या शिरपेचात मानाचा तुरा! दुर्गम भागातील आदिवासी लेकींनी मारली MBBS पर्यंत गगनभरारी

माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव

भामरागड (गडचिरोली) : शिक्षणाच्या सोयी-सुविधांपासून कोसो दूर असलेल्या आणि अतिदुर्गम,नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्याने आज शैक्षणिक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे.येथील तीन सामान्य कुटुंबातील,आदिवासी गुणवंत विद्यार्थिनींनी वैद्यकीय आणि उच्च शिक्षण क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करून केवळ आपल्या आई-वडिलांचेच नाही,तर संपूर्ण भामरागड तालुक्याचे नाव राज्याच्या नकाशावर उज्ज्वल केले आहे.या यशवंत लेकींचा भव्य सत्कार सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते या गुणवंत विद्यार्थिनींचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात या लेकींचे अभिनंदन केले.

भामरागडसारख्या भागात जिथे आजही वीज,रस्ता,नेटवर्क आणि उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शनाची वानवा आहे,अशा ठिकाणी या मुलींनी मिळवलेले यश हे अत्यंत प्रेरणादायी आहे.

१.कु.श्रुती लालसू वडे (रा. मलमपोडूर) अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या श्रुतीने NEET परीक्षेत घवघवीत यश मिळवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्ग येथे MBBS साठी प्रवेश मिळवला आहे.मलमपोडूर सारख्या छोट्याशा गावातून थेट MBBS पर्यंतची तिची भरारी ही भामरागडच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे.

२.कु.दिक्षा बारीकराव कुंजामी (रा. लाहेरी) लाहेरी या दुर्गम गावातील दिक्षाने देखील आपल्या मेहनतीच्या जोरावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धाराशिव येथे MBBS साठी निवड मिळवून आपल्या गावाचा गौरव वाढवला आहे.

३.कु.रोहिणी राजू कुरसामी,रोहिणी हिने B.Sc.साठी नागपूर येथे प्रवेश मिळवून उच्च शिक्षणाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.

अजयभाऊ कंकडालवार यांची मोलाची साथ

यावेळी मार्गदर्शन करताना मा.डॉ.अजयभाऊ कंकडालवार भावूक झाले.ते म्हणाले,भामरागडच्या मातीत गुणवत्ता कमी नाही,फक्त संधीची गरज आहे.आज या तीन लेकींनी हे सिद्ध करून दाखवले आहे.दुर्गम भागातील मुलींनी घेतलेली ही गगनभरारी अत्यंत अभिमानास्पद आहे.या मुली भविष्यात डॉक्टर होऊन आपल्याच भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांची सेवा करतील,हा मला विश्वास आहे.

त्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी,पुस्तकांसाठी, वसतिगृहासाठी किंवा इतर कोणत्याही अडचणीसाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य मी व माझे कुटुंब नेहमीच करेल.स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलीचे स्वप्न सत्यात उतरावे,हाच आमचा प्रयत्न राहील.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी भामरागड काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रसाद कुड्यामी यांच्या सह तिन्ही गुणवंत विद्यार्थिनींचे आई-वडील,कुटुंबीय, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दैदीप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून या गुणवंत विद्यार्थिनींवर अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close