डिजिटल युगातही रेंगेवाही गाव नेटवर्कपासून वंचित….अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गडचिरोली : एकीकडे देश डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत आहे,ऑनलाईन व्यवहार,डिजिटल शिक्षण,ऑनलाईन शेती योजनांचे दावे केले जात आहेत.तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाही या गावात आजही मोबाईलला एकही नेटवर्क मिळत नाही,ही शोकांतिका आहे.
गावकऱ्यांच्या या गंभीर समस्येला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व गावातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी,गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की,रेंगेवाही गावामध्ये सध्या कोणत्याही मोबाईल कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नाही.त्यामुळे गावकऱ्यांना मोबाईलवर कॉल करणे,संदेश पाठवणे, व्हॉट्सअॅप वापरणे तसेच इंटरनेटचा वापर करणे अजिबात शक्य होत नाही.फोन असूनही फोन नसल्यासारखी परिस्थिती गावकऱ्यांवर ओढवली आहे.
एखाद्याला गावातून बाहेरगावी असलेल्या नातेवाईकांशी बोलायचे असेल,तरी त्याला गाव सोडून दूर जंगलात किंवा उंच ठिकाणी जावे लागते.ही परिस्थिती २०२६ च्या भारतात आहे,यावर विश्वास बसणे कठीण आहे.
सध्याच्या डिजिटल युगात शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क अत्यंत आवश्यक झाले आहे.शासकीय योजनांचे ऑनलाईन अर्ज,आधार व ई-केवायसी,शेतकरी योजनांची माहिती,शैक्षणिक कामे,ऑनलाईन बँकिंग,डिजिटल व्यवहार,आरोग्य सेवा तसेच इतर ऑनलाईन शासकीय कामांसाठी नागरिकांना नेटवर्कची आवश्यकता असते.
मात्र गावात एकही नेटवर्क सेवा उपलब्ध नसल्यामुळे रेंगेवाही गावातील नागरिकांना या सर्व सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.शासनाच्या योजना कागदावर आहेत,पण नेटवर्कअभावी त्या गावापर्यंत पोहोचतच नाहीत.
नेटवर्कच्या अभावामुळे नागरिकांना ऑनलाईन कामासाठी गावापासून दूर असलेल्या ठिकाणी जावे लागते.त्यामुळे नागरिकांचा वेळ,पैसा आणि श्रम वाया जात असून शेतकरी, महिला,विद्यार्थी, जेष्ठ नागरिक तसेच इतर ग्रामस्थांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करता येत नाही,शेतकऱ्यांना हवामान,बाजारभाव,योजनांची माहिती वेळेवर मिळत नाही,तर महिलांना बँकेची,आरोग्याची ऑनलाईन कामे करता येत नाहीत.सर्वात गंभीर म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत आजारी व्यक्तीसाठी किंवा कोणत्याही संकटात मोबाईलद्वारे संपर्क साधणे देखील अत्यंत कठीण होते.जीवावर बेतणारी ही परिस्थिती आहे.
रेंगेवाही गावातील नागरिकांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन संबंधित मोबाईल नेटवर्क सेवा पुरवठादार कंपनी व संबंधित विभागाशी समन्वय साधून रेंगेवाही गावात मोबाईल टॉवर उभारणे किंवा अन्य आवश्यक तांत्रिक उपाययोजना करून मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी,अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
गावात नागरिकांना शासकीय योजना व डिजिटल सुविधांचा लाभ घेता यावा आणि दैनंदिन संपर्क व्यवस्था सुरळीत व्हावी,यासाठी या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी,अशी विनंती यावेळी करण्यात आली.
यावेळी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी गावकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि या प्रश्नाचा पाठपुरावा करून गावात लवकरात लवकर नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू,असा विश्वास गावकऱ्यांना दिला.त्यांच्या या भूमिकेमुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी गावातील महिला,युवक,शेतकरी व जेष्ठ नागरिक तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



