मोदुमतुर्ला येथील नागरिकांना महावितरणचा हजारोंचा शॉक; स्मार्ट मीटर हटवण्याची मागणी

अहेरी : तालुक्यातील मोदुमतुर्ला येथील रहिवाशांना महावितरणने (MSEDCL) अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवून आर्थिक भुर्दंड दिला आहे.मागील नऊ महिन्यांपासून मीटरचे रीडिंग न घेता अंदाजे बिल देण्यात आले आणि आता दहा महिन्यांचे रीडिंग एकाच वेळी घेऊन १५ ते ३० हजार रुपयांपर्यंतचे बिल एकाच वेळी पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या विरोधात आज दि. १७/०९/२०२६ रोजी मोदुमतुर्ला येथील ग्रामस्थांनी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता, कार्यालय अहेरी यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की नऊ महिने रीडिंग न घेतल्यामुळे युनिटचा दर वाढला असून, एकाच वेळी हजारो रुपयांचे बिल भरणे सामान्य नागरिकांना अशक्य आहे.आलेले बिल मागील नऊ महिन्यांच्या रीडिंगनुसार विभागणी करून देण्यात यावे आणि बसवलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर लावण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी निवेदन देताना प्रमुख म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार उपस्थित होते.त्यांच्यासोबत मोदुमतुर्ला येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



