कप्पेवंचा ते कोडसेपल्ली गावाला रस्ताच नाही; स्वातंत्र्यापासून एकदाही रस्ता बनला नाही – ग्रामस्थांची डॉ.अजय कंकडालवार यांच्याकडे न्यायाची मागणी

अहेरी : विकासाच्या गप्पा मारणाऱ्या शासनाच्या दाव्यांची पोलखोल करणारे चित्र अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात पाहायला मिळत आहे.स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही अहेरी तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी नुकतीच या अतिदुर्गम कप्पेवंचा गावाला भेट देऊन पाहणी केली व ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
धक्कादायक – कप्पेवंचा ते कोडसेपल्ली रस्ताच अस्तित्वात नाही!
येथील सर्वात धक्कादायक आणि गंभीर बाब म्हणजे,कप्पेवंचा गावापर्यंत कसाबसा खडीकरण रस्ता आहे,मात्र कप्पेवंचा पासून पुढे कोडसेपल्ली गावाला जाण्यासाठी आजपर्यंत एकदाही रस्ता बनवण्यात आलेलाच नाही.स्वातंत्र्य मिळाल्यापासून शासनाने कधीच रस्त्याचे काम केले नाही.त्यामुळे कोडसेपल्ली आणि परिसरातील नागरिकांना आजही जंगलातील पायवाटेवरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
रस्ता नाही तर विकास नाही – ग्रामस्थांची व्यथा
यावेळी ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की,कप्पेवंचा गावातील रस्त्यावर गुडघाभर चिखल साचला आहे.गावात कोणी आजारी पडल्यास रुग्णवाहिका गावापर्यंत येऊ शकत नाही. रुग्णाला झोळीवरून किंवा खांद्यावरून मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागते.
तसेच शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या चिखलातून वाट काढत जावे लागते,अनेकदा शाळा बुडवावी लागते.एवढाच नाही तर शेतात पिकवलेला माल बाजारात नेता येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
आम्ही अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली,पण केवळ आश्वासने मिळाली.कप्पेवंचा ते कोडसेपल्ली रस्ता आम्हाला जगण्यासाठी द्या,अशी भावनिक साद ग्रामस्थांनी डॉ.कंकडालवार यांच्याकडे घातली.
शासन दरबारी आवाज उठवणार – डॉ.कंकडालवार यांचे आश्वासन
ग्रामस्थांची ही बिकट परिस्थिती पाहून डॉ.अजय कंकडालवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले,कप्पेवंचा पर्यंत रस्ता असून पुढे कोडसेपल्ली पर्यंत एकदाही रस्ता न बनवणे हे अत्यंत दुर्दैवी आणि शासनाचे अपयश आहे.कप्पेवंचा ते कोडसेपल्ली हा नवीन रस्ता तातडीने मंजूर झाला पाहिजे.या रस्त्याच्या मंजुरीसाठी मी स्वतः शासन दरबारी,जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेत पाठपुरावा करणार असून,हा रस्ता मंजूर करूनच दाखवेन.
डॉ.कंकडालवार यांच्या या ठाम आश्वासनामुळे कप्पेवंचा व कोडसेपल्ली येथील ग्रामस्थांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले असून, त्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
या पाहणी दौऱ्यावेळी गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने महिला-पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.



