अहेरी तालुक्यातील कप्पेवंचा-कौटाराम मार्गावर वनविभागाची झाडे कोसळून रस्ता बंद
रुग्णवाहिका येण्यासही अडथळा,अजय कंकडालवार यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासन खडबडून जागे

अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कप्पेवंचा व कौटाराम या गावांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर वनविभागाची मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता पूर्णपणे बंद झाला होता.यामुळे दोन्ही गावातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
चारचाकी,दुचाकी वाहनांना ये-जा करता येत नव्हती.सर्वात गंभीर बाब म्हणजे गावात कोणी आजारी पडल्यास रुग्णवाहिका सुद्धा गावात येऊ शकत नव्हती.त्यामुळे गंभीर रुग्णांना खाटेवरून किंवा दुचाकीवरून जीव धोक्यात घालून रुग्णालयात न्यावे लागत होते.शाळकरी विद्यार्थी,गरोदर महिला आणि वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता.
ही गंभीर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार हे गावच्या दौऱ्यावर असताना ग्रामस्थांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
क्षणाचाही विलंब न करता कंकडालवार यांनी साधला प्रशासनाशी संपर्क
ग्रामस्थांची अडचण समजताच अजयभाऊ कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता जागेवरूनच भ्रमणध्वनीद्वारे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.त्यांनी अधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत,हा रस्ता या गावांसाठी लाईफलाईन आहे.झाडे पडल्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येत आहेत.तात्काळ यंत्रणा पाठवून रस्ता मोकळा करा,अशा कठोर शब्दात सूचना दिल्या.
कंकडालवार यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर वनविभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले असून,त्यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांची टीम पाठवून रस्त्यावर पडलेली सर्व मोठमोठी झाडे हटवून रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
अजयभाऊ कंकडालवार यांनी वेळोवेळी अतिदुर्गम भागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याने त्यांच्याबद्दल ग्रामस्थांमध्ये मोठा विश्वास आहे.त्यांच्या या तत्पर हस्तक्षेपामुळे लवकरच रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने कप्पेवंचा व कौटाराम येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.
यावेळी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते, दोन्ही गावांचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



