तीन दशकांची निस्वार्थ सेवा : डॉ.कन्ना मडावी यांची भेट घेऊन डॉ.अजय कंकडालवार यांनी दिल्या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा

अहेरी : उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कन्ना मडावी हे काही दिवसांपूर्वी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले.त्यांनी दुर्गम आदिवासी भागात तब्बल तीन दशकांहून अधिक काळ निस्वार्थ आणि समर्पित वैद्यकीय सेवा दिली.त्यांच्या या उत्कृष्ट आणि दीर्घकालीन रुग्णसेवेबद्दल अहेरीत त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला होता.
विशेष म्हणजे या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनाही निमंत्रण होते. परंतु ते एका प्रकरणात 52 दिवस चंद्रपूर कारागृहात असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते.
4 ऑगस्ट,रविवार रोजी डॉ.कंकडालवार यांची जामिनावर सुटका झाली.सुटताच त्यांनी जनतेच्या भेटीगाठी आणि सामाजिक कार्यक्रमांना सुरुवात केली.त्याच एक भाग म्हणून काल 7 ऑगस्ट रोजी डॉ.कंकडालवार यांनी डॉ.कन्ना मडावी यांच्या अहेरी येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी डॉ.मडावी यांच्या आरोग्याची विचारपूस केली.तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात त्यांनी दिलेल्या अमूल्य सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.डॉ. मडावी यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या दुसऱ्या आयुष्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
डॉ.मडावी यांनी या भागातील हजारो गरीब आणि आदिवासी रुग्णांना नवजीवन दिले आहे.त्यांची सेवा ही आमच्यासाठी आदर्श आहे,असे गौरवोद्गार डॉ.अजय कंकडालवार यांनी यावेळी काढले.
डॉ.कन्ना मडावी यांनीही डॉ.कंकडालवार यांच्या भेटीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले.यावेळी अजय कंकडालवार यांचासोबत स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



