Uncategorized

NH-353 C चे काम 25 तारखेपर्यंत पूर्ण करा, अन्यथा गुन्हे दाखल करणार

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

अहेरी : दक्षिण गडचिरोलीची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 353 सीच्या गेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या कामाबत माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरी मतदार संघाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आज कठोर भूमिका घेतली आहे.

जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी घेतलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करताच, आत्राम यांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून येत्या 25 तारखेपर्यंत उर्वरित पूल अप्रोचेस पूर्ण न झाल्यास दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे कडक निर्देश दिले.

संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी भेटीदरम्यान सांगितले की,सिरोंचा ते आलापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे.रस्त्यावर मोठे खड्डे, चिखल आणि अपूर्ण पूल यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गरोदर महिला,शाळकरी मुले,रुग्ण आणि शेतकऱ्यांना या मार्गावरून ये-जा करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.अनेक अपघातही याच खराब रस्त्यांमुळे झाले आहेत असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे या मार्गावरील अनेक पुलांचे काम अर्धवट करून ठेकेदारांनी सोडून दिले आहे.त्यामुळे पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे.

संपूर्ण जिल्ह्याच्या रस्त्यांकडे लक्ष वेधले

केवळ NH-353 C नव्हे तर जिल्ह्यातील इतर सर्व महत्त्वाच्या महामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था देखील संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी आमदार आत्राम यांच्या निदर्शनास आणून दिली.रस्त्यांअभावी शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचत नाही,रुग्ण वेळेवर दवाखान्यात पोहोचू शकत नाहीत आणि शालेय मुलांचे शिक्षण विस्कळीत होत आहे,हे त्यांनी सविस्तरपणे सांगितले.

आमदार आत्राम यांचा कडक इशारा

संतोषभाऊंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तातडीने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

दक्षिण गडचिरोलीचा विकास हा रस्त्यांवरूनच होणार आहे.6 वर्षे लोकांनी त्रास सहन केला.आता आणखी एक दिवसही चालणार नाही,असे सांगून त्यांनी दोन महत्त्वाचे आदेश दिले:

1. येत्या 25 तारखेपर्यंत NH-353 C वरील सर्व उर्वरित पूल अप्रोचेस आणि रखडलेली कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात यावीत.

2. जर दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास जबाबदार कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत.

आमदारांच्या या कडक भूमिकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.आमदार आत्राम यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या प्रश्नाने त्रस्त असलेल्या दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी आमदार आत्राम यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल आभार मानले आणि आता दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होऊन नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close