काप्पेवंचात आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे PVTG माडिया जमातीच्या २ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू
काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट, दिला न्यायाचा शब्द

अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल काप्पेवंचा गावात आरोग्य विभागाच्या कथित निष्काळजीपणामुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.लसीकरणानंतर अवघ्या काही तासात दोन महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात संताप आणि शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं? आई-वडिलांचा थरकाप उडवणारा जबाब
मृत बाळाची आई सौ.सुनीता शामराव तलांडी आणि वडील शामराव तलांडी यांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.०७/०९/२०२६ रोजी दुपारी २ वाजता आरोग्य सेविका,MPW,आशा वर्कर आणि एक कंत्राटी आरोग्य सेवक असेचौघेजण त्यांच्या घरी आले.बाळाला लसीकरण द्यायचं आहे असे सांगून त्यांनी चिमुकल्याला एकाच वेळी ४ इंजेक्शन टोचले आणि २ वेगवेगळ्या बाटल्यांमधून औषधाचे २ डोस पाजले.
इंजेक्शननंतर एक दिवस ताप येईल,घाबरू नका असे सांगून आरोग्य कर्मचारी कवठाराम गावाकडे निघून गेले.परंतु काही तासातच बाळाने दूध पिणे बंद केले,बेशुद्ध झाल्यासारखे पडून राहिले.रात्री १२ वाजता आई-वडिलांनी पाहिले असता बाळ निपचित पडले होते,त्याचा मृत्यू झाला होता.
तक्रार करूनही आरोग्य विभागाची मुजोरी – PM ला आणि अंत्यविधीला एकही अधिकारी नाही?
या घटनेनंतर पीडित कुटुंबाने आशा वर्कर आणि आरोग्य सेविकेला फोन लावला,मात्र कोणीही फोन उचलला नाही.अखेर दि.०८/०९/२०२६ रोजी कुटुंबाने राजाराम पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बाळाचा मृतदेह PM साठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेताना पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोडसेपल्ली उपकेंद्राचा एकही अधिकारी-कर्मचारी सोबत आला नाही.PM च्या वेळी आणि नंतर काप्पेवंचा येथे अंत्यविधीच्या वेळीही आरोग्य विभागाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.हा किती मोठा हलगर्जीपणा आहे?PM झाल्यानंतरच आरोग्य विभागाचे कर्मचारी घरी येऊन केवळ बयान घेऊन गेले. अद्याप PM रिपोर्ट आलेला नाही.
डॉ.अजयभाऊ कंकडालवार घटनास्थळी – प्रशासनाला धारेवर धरले
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी तातडीने काप्पेवंचा गावात धाव घेत पीडित तलांडी कुटुंबाची आणि गावकऱ्यांची भेट घेतली.
त्यांनी यावेळी थेट भ्रमणध्वनीवरून आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून PM रिपोर्ट तात्काळ सादर करा आणि दोषींवर कठोर कारवाई करा अशा सूचना दिल्या.तसेच या दुःखाच्या प्रसंगी तलांडी कुटुंबाला पुढील होणाऱ्या कार्यक्रमाला आर्थिक मदतही केली.
एका आदिम जमातीच्या निष्पाप बाळाचा अशा पद्धतीने मृत्यू होणे हे आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे.PM रिपोर्ट येताच मी या प्रकरणाचा पाठपुरावा करून दोषींना सोडणार नाही,असा इशारा यावेळी अजयभाऊंनी दिला.
यावेळी माजी सभापती भास्कर तलांडे,सौ.सुरेखा आलाम,माजी जि.प. सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,इरापा गावडे,गावचे पाटील कोत्ता आत्राम,राजू तलांडी, विनोद तलांडी यांच्यासह काप्पेवंचा,कवठाराम येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.
या घटनेमुळे काप्पेवंचा गावातील आरोग्य,रस्ते,पाणी यासारख्या मूलभूत समस्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



