Uncategorized

आलापल्ली वनविभागात वाघाचा धुमाकूळ?

मरपल्लीच्या २३ वर्षीय युवकाने झाडावर रात्र काढून वाचवला जीव, गावात भीतीचे वातावरण

मरपल्ली (ता. एटापल्ली), दि. १३ : एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली,वासामुंडी,कोकोबंडा या जंगल परिसरात वाघाचा मुक्त वावर वाढल्याने आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.काल घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

दिनांक १२/०९/२०२६ रोजी शनिवारी,मरपल्ली येथील युवक महेंद्र भाऊजी दुर्वा (वय २३) हा बैल चारायला जंगलात गेला असता अचानक त्याच्यासमोर वाघ आला.प्रसंगावधान राखत आणि हुशारीने महेंद्रने जवळच्या झाडावर चढून आपला जीव वाचवला.भर जंगलात, जीव मुठीत घेऊन त्याने झाडावरच अख्खी रात्र काढली.

रात्री उशिरापर्यंत युवक घरी न परतल्याने कुटुंबीयांनी गावात माहिती दिली. त्यानंतर आज दि. १३/०९/२०२६ रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान प्रत्येक घरातून एक व्यक्ती याप्रमाणे संपूर्ण गावकरी जंगलात शोधायला गेले असता हा युवक भयभीत अवस्थेत झाडावर बसलेला आढळून आला. सुदैवाने त्याचा जीव वाचला.

काँग्रेस नेते प्रज्वल नागूलवार यांचा वनविभागाला इशारा

या घटनेनंतर गावात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.शेतकरी,गुराखी जंगलात जायला घाबरत आहेत.याबाबत तालुका काँग्रेस नेते तथा मरपल्ली गावकरी श्री.प्रज्वल नागूलवार यांनी मा.उपवनसंरक्षक,वनविभाग आलापल्ली – भामरागड यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,मरपल्ली,वासामुंडी,कोकोबंडा परिसरात फिरणाऱ्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा.अन्यथा एखाद्या निष्पाप आदिवासीचा बळी गेल्यास त्याला सर्वस्वी शासन-प्रशासन जबाबदार राहील.जर तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close