एमपीएससीत राज्यात द्वितीय आलेले शुभम पाटील अहेरीचे नवे उपविभागीय अधिकारी : डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी केले स्वागत

अहेरी : कोल्हापूरचे सुपुत्र व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावणारे कर्तव्यदक्ष अधिकारी शुभम पाटील यांनी अहेरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून परिविक्षाधीन कालावधीत कार्यभार स्वीकारला आहे.त्यांच्या आगमनाने अहेरी उपविभागाच्या प्रशासकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
अहेरी नगरीत रुजू झाल्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपविभागीय अधिकारी शुभम पाटील यांची त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली.यावेळी डॉ.अजयभाऊंनी पुष्पगुच्छ देऊन शुभम पाटील यांचे अहेरी नगरीत मनःपूर्वक स्वागत केले व पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मूळ कोल्हापूरचे असलेले शुभम पाटील यांनी आपल्या जिद्द,चिकाटी व स्मार्ट अभ्यासपद्धतीच्या जोरावर एमपीएससी परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली.त्यांचा हा प्रवास आजच्या युवकांसाठी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
यावेळी डॉ.अजयभाऊ कंकडालवार म्हणाले,शुभम पाटील यांच्यासारखा हुशार व कर्तव्यनिष्ठ अधिकारी अहेरी उपविभागाला लाभला हे आपले भाग्य आहे.आदिवासीबहुल व दुर्गम असलेल्या अहेरी उपविभागात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना ते प्रभावीपणे राबवतील.नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवून शासन,प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी करतील व प्रत्येकासाठी सुलभ व सहज उपलब्ध अधिकारी म्हणून ते नावलौकिक मिळवतील,असा आम्हाला विश्वास आहे.
अहेरीसारख्या नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल भागात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल शुभम पाटील यांनी समाधान व्यक्त केले.जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी अजय कंकडालवार सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव हनुमंतू मडावी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,स्वप्नील मडावी यांच्या सह आदी उपस्थित होते.



