ग्रामपंचायतीच्या अधिकारावर गदा;पूर्वसूचना न देता ई-निविदा काढण्यावर कमलापूर सरपंचाचा आक्षेप

अहेरी (ता़ प्र.)तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायत हद्दीअंतर्गत येत असलेल्या विविध अंगणवाडी केंद्राचे बांधकामासंदर्भात ग्रामपंचायतीला कोणतीही पुर्वसूचना वा परवानगी न घेता विभागामार्फत ई-निविदा काढण्यावर कमलापूरच्या सरपंचा रजनीता मडावी यांनी आक्षेप घेतला आहे़ सदर प्रकार ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा आणणारा असून सदर निविदा तत्काळ रद्द करावी, अन्यथा न्यायासाठी न्यायालयाचे दार ठोठावण्याचा इशारा त्यांनी जि.पसीईओ यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे़.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांना पाठविलेल्या निवेदनात सरपंचा रजनीता यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या विविध अंगणवाडी केंद्रांच्या बांधकाम/दुरुस्ती कामांसंदर्भात कोणतीही पूर्वसूचना, परवानगी किंवा ग्रामपंचायतीशी कोणताही पत्रव्यवहार न करता संबंधित विभागामार्फत थेट ई-टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे, ही बाब अत्यंत खेदजनक व ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा आणणारी आहे.ग्रामपंचायत कमलापूर सदर सर्व कामे नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने करण्यास पूर्णपणे सक्षम व तत्पर असतांना ग्रामपंचायतीला वगळून थेट टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारांचा भंग झाल्याचा दावा त्यांनी केला आहे़ त्यामुळे सदर टेंडर तात्काळ रद्द करुन अंगणवाडीची सर्व कामे ग्रामपंचायतीला सुपूर्द करावे, अन्यथा ग्रामपंचायत आपल्या हक्कासाठी न्यायालयाचे दार ठोठावेल असा इशारा सरपंचा रजनीता मडावी यांनी दिला आहे़



