अहेरीच्या वेलगूर गावच्या दोन युवकांची स्टेट लेव्हल व्हालीबॉलसाठी निवड
आर्थिक अडचणीत माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांचा मदतीचा हात

अहेरी : तालुक्यातील वेलगूर येथील सनम दीपक राऊत व सौरव तानाजी मराठे या दोन युवकांनी अंडर-14 विदर्भ स्तरीय व्हालीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.या यशामुळे दोघांचीही महाराष्ट्र राज्य स्तरीय व्हालीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून येत्या 19 मे रोजी पुणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांना रवाना व्हायचे आहे.
सनम व सौरव दोघेही अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत.घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुण्यापर्यंतचा प्रवास,राहण्याचा खर्च,किट व इतर खर्च कसा करायचा या विवंचनेत दोघांचे कुटुंबीय होते.हुशार असूनही पैशांअभावी स्वप्न अधुरे राहते की काय,अशी भीती पालकांना सतावत होती.
या युवकांच्या परिस्थितीची माहिती अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.गीताताई चालूरकर यांना मिळाली.त्यांनी तात्काळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्याशी संपर्क साधून दोन्ही खेळाडूंची परिस्थिती कथन केली.ही मुलं आपल्या तालुक्याचा अभिमान आहेत,यांना मदत केलीच पाहिजे असे गीताताई म्हणाल्या.
माहिती मिळताच डॉ.अजय कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता आज स्वतः वेलगूर गाव गाठले.त्यांनी सनम दीपक राऊत व सौरव तानाजी मराठे यांच्या घरी जाऊन दोघांची भेट घेतली.दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुणे येथे स्पर्धेसाठी जाण्याकरिता रोख आर्थिक मदत सुपूर्द केली.
यावेळी डॉ.कंकडालवार यांनी दोन्ही युवकांना व त्यांच्या कुटुंबीयांना धीर देत सांगितले तुम्ही फक्त खेळावर लक्ष केंद्रित करा,पुण्याला गेल्यावर राहणे,जेवण किंवा इतर काही अडचण भासल्यास लगेच मला फोन करा,मी सर्वतोपरी आर्थिक मदत करीन पैशांमुळे तुमचे करिअर थांबणार नाही,याची मी काळजी घेईन.त्यांच्या या शब्दांनी कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
वेलगूरसारख्या नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील मुलांनी राज्य पातळीवर निवड होणे ही संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.आमच्या गावच्या पोरांनी मोठी मजल मारली,अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.अजय कंकडालवार यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वेलगूरसह संपूर्ण अहेरी तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.
डॉ.कंकडालवार म्हणाले,गडचिरोली जिल्ह्यात टॅलेंटची कमतरता नाही,फक्त संधी व आर्थिक पाठबळाची गरज आहे.शासनाने ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी विशेष योजना राबवावी.आम्ही आमच्या परीने अशा होतकरू खेळाडूंच्या पाठीशी नेहमीच उभे राहू.
सनम व सौरव हे दोघेही 19 मे रोजी पुण्याकडे रवाना होणार आहेत.या दोघांनी राज्य स्तरावरही चमकदार कामगिरी करून अहेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याचे नाव देशपातळीवर न्यावे,अशा शुभेच्छा सर्व स्तरातून दिल्या जात आहेत.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.गीता चालुरकर,प्रवीण रेषे,रविंद्र गाऊत्रे,संदीप चौधरी,तानाजी मराठे,महेश राऊत,आनंदराव मराठे,अरविंद कन्नाके,हरिदास आत्राम,देवराव गडेकर,दिलीप राऊत,नितीन देवनाथ,अतुल,तुकाराम राऊत, भुमाजी गदेकर,मुकेश गदेकर,यादव झोडे यांच्या सह स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.



