Uncategorized

पगाराविना वनमजुरांचे हाल; आलापल्लीत संताप,अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे धाव

आलापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या आलापल्ली येथील महाराष्ट्र काष्ठ भांडार क्र.१ येथे काम करणाऱ्या गरीब रोजंदारी वनमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.इंडियन सिक्युरिटी फोर्स,चंद्रपूर या कंत्राटी एजन्सीमार्फत काम करणाऱ्या या मजुरांना माहे जून २०२६ पासून आजपर्यंत तब्बल ४ महिन्यांपासून एक रुपयाही पगार मिळालेला नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या सर्व रोजंदारी मजुरांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतचे लेखी निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांना देऊन तात्काळ न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

काय आहे मजुरांचे म्हणणे

निवेदनात मजुरांनी आपली व्यथा मांडताना म्हटले आहे की,आम्ही खालील सही करणारे सर्व रोजंदारी वनमजूर म.का.भां. क्र.१ आलापल्ली येथे पुढीलप्रमाणे कामे करतो – ऑफिस साफसफाई करणे,प्रत्येक प्लॉटवर जाऊन साफसफाई करणे,गाडीला लोड दाखवणे,फिल्डींगच्या कामात मदत करणे व इतर सर्व शासकीय कामात मदत करणे.परंतु मागील चार महिन्यांपासून माहे जून २०२६ पासून आजपर्यंत पगार झालेले नाही.यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे.दुकानदारांनी उधारी देणे बंद केलेले आहे.खायला काहीही नाही अशा परिस्थितीत आम्ही काम करू शकत नाही.त्यामुळे जोपर्यंत आम्हाला पगार मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व रोजंदारी मजूर कोणतेही शासकीय कामे करणार नाही.

अटी-शर्तीनुसार कोणतीही सुविधा नाही – गंभीर आरोप

इंडियन सिक्युरिटी फोर्स,चंद्रपूर यांनी मान्य केलेल्या अटी-शर्तीनुसार आजपर्यंत कोणत्याही प्रकारची सोय व सुविधा प्राप्त झालेली नसल्याचा गंभीर आरोपही मजुरांनी केला आहे.

मजुरांच्या प्रमुख मागण्या अशा 

१) माहे जून २०२६ पासूनचा सर्व थकीत पगार एकत्रित तात्काळ मिळण्यात यावा.२)दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नियमित पगार उपलब्ध करून देण्यात यावा.३) आजपर्यंत आरोग्य विमा (ESIC) पॉलिसी तयार करून दिलेली नाही,ती तात्काळ तयार करून देण्यात यावी.४)सर्व मजुरांचे EPF दर महिन्याला जमा करण्यात यावे. काही रोजंदारी मजुरांचे माहे जानेवारी २०२५ पासूनचे EPF अध्यापही जमा करण्यात आलेले नाही, ते तात्काळ जमा करावे.५) मागील एप्रिल २०२६ ला संगणक चालक यांचा मजुरी दर कमी झाल्याने त्यांचे पगार कपात करण्यात आले.

मजुरी दर वाढल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनंतर नवीन दरपत्रक प्राप्त होते,त्यात मागील महिन्यापासून दर वाढवण्यात आलेला असतो.अशा वेळेस जुन्या दरानुसारच पगार करण्यात येतो,त्यात आमचे मोठे आर्थिक नुकसान होते. यापुढे असे घडल्यास पुढील महिन्यात इन्क्रीमेंट काढून नवीन दरानुसार सर्व रोजंदारी मजुरांना पगार करण्यात यावा.

जर दोन ते तीन दिवसात पगार नाही दिला गेला तर आम्ही सर्व मजूर वनपरीक्षेत्र कार्यालय

म.का.भां.क्र.१आलापल्ली येथे आमरण उपोषणास बसू,असा थेट इशारा मजुरांनी दिला आहे.यासाठी दिनांक १३.१०.२०२६ रोजी सकाळी ११ वाजतापासून ठिय्या आंदोलन करण्यात येईल,असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.

दरम्यान,अत्यंत गरीब परिस्थितीतील या आदिवासी वनमजुरांच्या प्रश्नावर डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी जातीने लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून द्यावा व संबंधित कंत्राटदार एजन्सीवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी संपूर्ण आलापल्ली परिसरातून होत आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close