छल्लेवाडा येथे अनोखे रक्षाबंधन; आंदोलनानंतर डॉ. अजय कंकडालवार यांना भगिनींनी बांधली राखी, जिव्हाळ्याची चर्चा

अहेरी / छल्लेवाडा : राजकारणापलीकडे जाऊन नातं जपणारा एक हृदयस्पर्शी प्रसंग काल छल्लेवाडा येथे पाहायला मिळाला.गोलाकर्जी-रेपनपल्ली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दिवसभर आंदोलन करून थकलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा माजी जि.प.अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार घरी परतत असताना,छल्लेवाडा येथील महिला भगिनींनी त्यांना थांबवून हातावर राखी बांधून रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला.रस्त्यावरील धूळ आणि आंदोलनाचा थकवा क्षणात नाहीसा करणारा हा प्रेमाचा क्षण होता.
आंदोलनाच्या ठिकाणीच जमलेल्या महिलांनी डॉ.कंकडालवार यांना आपला भाऊ मानत राखी बांधली.यावेळी डॉ.कंकडालवार यांनीही सर्व भगिनींना भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला.
फक्त राखीपुरताच हा कार्यक्रम मर्यादित न राहता,यानंतर डॉ. कंकडालवार यांनी गावातील महिलांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.शाळा,पाणी,आरोग्य,रस्ते आणि शेतीच्या अडचणींबाबत महिलांनी आपल्या भावाकडे मनमोकळ्या गप्पा मारत समस्या मांडल्या.
यावेळी बोलताना डॉ. कंकडालवार म्हणाले छल्लेवाडा येथे माझ्या भगिनींसोबत रक्षाबंधनाचा हा पवित्र आणि जिव्हाळ्याचा सण साजरा केला.राजकारणात अनेक आंदोलने केली,पण आंदोलन संपल्यावर मिळालेले हे बहिणींचे प्रेम हे माझ्यासाठी सर्वात मोठे बक्षीस आहे.
या प्रेमळ भेटीच्या निमित्ताने माझ्या सर्व भगिनींना भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा छोटासा प्रयत्न केला.बहिण-भावाच्या नात्यातील प्रेम,आपुलकी आणि विश्वास अधिक घट्ट करणारा हा सण माझ्यासाठी नेहमीच विशेष आहे.
माझ्या प्रत्येक भगिनीच्या सुख-दुःखात,अडचणीत आणि प्रगतीच्या वाटचालीत भाऊ म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा माझा शब्द आहे.
या अनोख्या रक्षाबंधनामुळे आंदोलनाच्या दिवशी राजकीय नेत्यापलीकडे एका भाऊचे दर्शन घडले,अशी चर्चा संपूर्ण छल्लेवाडा परिसरात रंगली आहे.



