Uncategorized

शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त इंदाराम येथे भव्य अभिवादन सोहळा

सद्दूला बतुकम्मा उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन - डॉ. अजय कंकडालवार यांचा सामाजिक एकतेचा संदेश

अहेरी | स्वातंत्र्य लढ्यातील महानायक,आदिवासी अस्मितेचे प्रतीक आणि शूर क्रांतिकारक शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे भव्य अभिवादन सोहळा पार पडला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांच्या हस्ते शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

काल पार पडलेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ,युवक आणि महिला उपस्थित होत्या.डॉ. कंकडालवार यांनी यावेळी शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या शौर्यगाथेला उजाळा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना डॉ.अजय कंकडालवार म्हणाले,१८५७ च्या उठावापासून ते जंगल सत्याग्रहापर्यंत आदिवासी समाजाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले आहे.त्यातील एक तेजस्वी नाव म्हणजे वीर बाबुराव शेडमाके.अवघ्या २५ व्या वर्षी इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध बंड पुकारून त्यांनी आदिवासी जंगल, जमीन आणि अस्मितेसाठी लढा दिला.त्यांनी दिलेले बलिदान हे केवळ इतिहास नाही,तर आजही अन्याय,भ्रष्टाचार आणि शोषणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आहे.

त्यांनी पुढे सांगितले की,आजच्या तरुण पिढीने वीर बाबुराव शेडमाके यांचा इतिहास समजून घेऊन त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे.शिक्षण,संघटन आणि संघर्ष हाच खरा त्यांना अभिवादन करण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले.

बतुकम्मा उत्सव आणि महाप्रसादातून संस्कृतीचा जागर

याच शहीद दिनाचे औचित्य साधून सद्दूला बतुकम्मा उत्सवानिमित्त इंदाराम येथे भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन देखील डॉ. अजय कंकडालवार यांच्याकडून करण्यात आले होते.

बतुकम्मा हा तेलंगणा आणि गडचिरोलीच्या सीमावर्ती भागातील सर्वात मोठा महिला-केंद्रित सांस्कृतिक उत्सव मानला जातो.नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात महिला विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली बतुकम्मा तयार करून तिची पूजा करतात.ही परंपरा निसर्ग, स्त्री शक्ती आणि बहीण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक आहे.

इंदाराम येथील कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून बतुकम्मा भोवती फेर धरून पारंपरिक गीते गायली.फुलांची आकर्षक आरास, देवीची मनोभावे पूजा आणि ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहमय झाला होता.

या महाप्रसाद कार्यक्रमासाठी केवळ इंदारामच नव्हे,तर परिसरातील विविध गावांतील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती.डॉ.कंकडालवार यांच्याकडून स्वखर्चाने आयोजित या महाप्रसादाचा लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी आस्वाद घेतला.

महाप्रसाद वाटपावेळी एकोप्याचे दर्शन घडले.सर्व जाती-धर्माचे लोक एकाच पंगतीत बसून भोजन करत असल्याने सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले.

एकीकडे शहीद वीराला अभिवादन करून शौर्य आणि बलिदानाला वंदन करणे, तर दुसरीकडे बतुकम्मा उत्सवाच्या माध्यमातून संस्कृती आणि परंपरेचा सन्मान करणे,अशा दोन उपक्रमांचा संगम एकाच दिवशी इंदाराम येथे पाहायला मिळाला.यामुळे हा दिवस इंदाराम वासियांसाठी अविस्मरणीय ठरला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अजय कंकडालवार यांच्या कार्यकर्त्यांनी व गावातील नागरिकांनी केले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि युवकांनी परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे इंदाराम परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, डॉ. अजय कंकडालवार यांच्या या सामाजिक आणि सांस्कृतिक पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close