जोगनगुडा गावच्या ई-पीक पाहणीत चूक; नकाशा बदलामुळे शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित, अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन

अहेरी : तालुक्यातील जोगनगुडा येथील ई-पीक पाहणीचा गाव नकाशा चुकून बदलला गेल्याने गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचे ई-पीक पाहणी होत नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.यामुळे शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत.या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत तहसीलदार,तहसील कार्यालय अहेरी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की,मौजा जोगनगुडा येथील गाव नकाशा चुकून दुसऱ्या गावाच्या नकाशात मिसळला गेला आहे.उमनूर जोगनगुडा येथे प्रशासनाच्या नजरचुकीने नकाशा तबदील झाला आहे.त्यामुळे सन २०२५ च्या मागील वर्षापासून दोन्ही जोगनगुडा गावाची ई-पीक पाहणी होऊ शकली नाही.
ई-पीक पाहणी झाली नसल्याने शेतकऱ्यांना शासनाची धान आधारभूत किंमत योजना,किसान कर्ज योजना,धान बोनस तसेच इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.हे सर्व प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
त्यामुळे तहसीलदार साहेबांनी आपल्या स्तरावरून चौकशी करून मौजा जोगनगुडा येथील ई-पीक पाहणी पूर्ववत करून द्यावी,व पूर्ववत होईपर्यंत ७/१२ वर लेखी स्वरूपात देण्याची सोय करावी,जेणेकरून जोगनगुडा येथील शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाहीत,अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी डॉ.अजयभाऊ कंकडालवार म्हणाले,प्रशासनाच्या एका चुकीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.धान खरेदी,कर्ज,बोनस यासाठी ई-पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे.प्रशासनाने तातडीने नकाशा दुरुस्त करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
या निवेदनावेळी जोगनगुडा येथील पीडित शेतकरी,ग्रामस्थ व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



