Uncategorized

पॅराडाईज स्कूलमध्ये 47 आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचा प्रकार

डॉ.अजय कंकडालवार यांच्या हस्तक्षेपानंतर 7 दिवसात प्रश्न सुटण्याचे ATC यांचे आश्वासन

अहेरी : पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल,आरमोरी या नामांकित शाळेतील 47 आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.या प्रकरणात पालकांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी तातडीने लक्ष घातले आहे.

पालकांनी दिलेल्या निवेदनानुसार, अहेरी तालुक्यातील 22 आणि भामरागड तालुक्यातील 25 असे एकूण 47 विद्यार्थी यावर्षी पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, आरमोरी येथे इयत्ता 10 वी मध्ये प्रवेशित आहेत.शाळा दि.30 जून 2026 पासून सुरू झाली आहे.

मात्र पालकांनी मुला-मुलींना शाळेत सोडण्यासाठी आणि प्रवेशाबाबत शाळेचे प्राचार्य व प्रशासनाशी संपर्क साधला असता,चालू सत्रामध्ये मा.अप्पर आयुक्त,आदिवासी विकास,नागपूर यांचे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत आदेश प्राप्त झालेले नाहीत,असे सांगून शाळेने मुलांना प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

इयत्ता 10 वीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.शाळा सुरू होऊन 1 महिना 10 दिवस उलटून गेले तरीही प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.यामुळे पालकांमध्ये प्रचंड चिंता आणि नाराजी आहे.

कंकडालवार यांची आयुक्तांशी थेट चर्चा

सदर निवेदन मिळताच डॉ.अजय कंकडालवार यांनी तातडीने आदिवासी विकास आयुक्तालय, नागपूर (ATC) च्या आयुक्त आयुषी सिंग मॅडम यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

यावेळी आयुक्त आयुषी सिंग मॅडम यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी येत्या 7 दिवसांच्या आत या समस्येचे निराकरण करून सर्व 47 विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

डॉ.कंकडालवार यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.आमच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार होते.अजयभाऊंनी वेळेत लक्ष घातल्याने आम्हाला न्याय मिळण्याची आशा आहे,असे पालक म्हणाले.

दरम्यान,दिलेल्या वेळेत प्रश्न न सुटल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close