अहेरी महिला व बाल रुग्णालयासमोर प्रवासी निवाऱ्याची मागणी
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन

अहेरी : दक्षिण गडचिरोलीतील आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयासमोर रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी तातडीने प्रवासी निवारा अर्थात प्रतीक्षागृह उभारण्यात यावे,अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती जिल्हा अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.
त्यांनी याबतचे निवेदन माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना देऊन तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
अहेरी येथील महिला व बाल रुग्णालय हे केवळ अहेरी तालुक्यापुरते मर्यादित नाही.अहेरी, एटापल्ली,भामरागड,सिरोंचा, मुलचेरा या दक्षिण गडचिरोलीतील पाचही तालुक्यांसह शेजारील तेलंगणा राज्यातील नागरिक देखील उपचारासाठी मोठ्या संख्येने येथे येत असतात.
गर्भवती माता,नवजात बालके,ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर रुग्णांना सोबत घेऊन त्यांचे नातेवाईक दररोज रुग्णालयात दाखल होत असतात.मात्र रुग्णालयासमोर बसण्यासाठी किंवा प्रतिकूल हवामानात थांबण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सध्या रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना झाडाखाली किंवा रस्त्याच्या कडेला उघड्यावर बसावे लागत आहे.पावसाळ्यात पावसापासून बचाव नाही,उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो आणि रात्रीच्या वेळी थंडी व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.
विशेषतः दुर्गम भागातून आलेल्या महिला,लहान मुले आणि वृद्ध नातेवाईकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे.अनेक वेळा रुग्णांना दाखल करून नातेवाईकांना रात्रभर जागरण करावे लागते,परंतु त्यांच्यासाठी साधे निवारेही उपलब्ध नाही.
संतोष ताटीकोंडावार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,प्रस्तावित प्रवासी निवाऱ्यात खालील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात:
– बसण्यासाठी बाके आणि पुरेशी जागा
– पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
– स्वच्छतागृहाची सुविधा
– पंखे आणि प्रकाश व्यवस्था
– पावसाळा व उन्हाळ्यापासून संरक्षण
ही सुविधा उपलब्ध झाल्यास दररोज येणाऱ्या हजारो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळेल.आरोग्यसेवा अधिक लोकाभिमुख आणि सुलभ होण्यास मदत होईल,असे ते म्हणाले.
आमदार आत्राम यांच्याकडे सकारात्मक अपेक्षा
निवेदन देताना जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती जिल्हा अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या विकासाभिमुख आणि लोकहितवादी भूमिकेचा गौरव केला.त्यांनी या जनहिताच्या मागणीची सकारात्मक दखल घेऊन संबंधित विभागाला तातडीने निर्देश द्यावेत,अशी विनंती केली.
NH-353 C च्या दुरवस्थेवरही झाली चर्चा
याच भेटीदरम्यान दक्षिण गडचिरोलीची लाईफलाईन असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 353 C च्या गेल्या 6 वर्षांपासून झालेल्या दुरवस्थेबाबत देखील गंभीर चर्चा करण्यात आली.खड्डे,अर्धवट कामे आणि अपघातांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या त्रासाबत आमदार महोदयांना माहिती देण्यात आली.
आमदार आत्राम यांनी दोन्ही विषय गांभीर्याने ऐकून घेतले आणि लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.



