Uncategorized

निधी अडकल्याने आलापल्ली-सिरोंचा रस्त्याचे काम ठप्प ; कंत्राटदाराने अर्धवट सोडले काम

पावसाळ्यात वाहनधारक हैराण : राष्ट्रीय महामार्ग 353 चे काम 3 महिन्यांपासून बंद

आलापल्ली : ते सिरोंचा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 353 वरील विकासकामे गेल्या 3 महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहेत.शासनाकडून देयके न मिळाल्याच्या कारणावरून कंत्राटदाराने काम अर्धवट अवस्थेत सोडून दिल्याने परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टेकमपल्ली ते फटाजवळील साखळी येथील किमी 286 ते 600 या पट्ट्यात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाला नुकतेच नव्याने सुरुवात झाली होती.परंतु देयके रखडल्यामुळे आणि कामगारांना पगार न मिळाल्याने कंत्राटदाराने काम बंद करून माघार घेतली.

दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात टाकण्यात आलेला डायव्हर्शनचा रस्ता देखील पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे.त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मजूर-कंत्राटदार त्रस्त,काम अनिश्चित काळासाठी बंद 

कंत्राटदाराच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर महिन्यापासून सुमारे 40 मजूर आणि आवश्यक साहित्य घेऊन पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु मागील 3 महिन्यांपासून कंपनीकडून एकही रुपयाचे देयक अदा करण्यात आले नाही. वारंवार संपर्क साधूनही अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

देयके न मिळाल्याने मजुरांचे वेतन, त्यांची राहण्याची सोय आणि इतर खर्च भागवणे अशक्य झाले.त्यामुळे अखेर काम बंद करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे कंत्राटदाराने स्पष्ट केले. त्यामुळे हे काम आता अनिश्चित काळासाठी रखडण्याची शक्यता आहे.

वाहनधारक संतप्त,तातडीने काम सुरू करण्याची मागणी 

पावसाळ्यात या महामार्गाची दुरवस्था अधिकच वाढली आहे.खड्डे,चिखल आणि अर्धवट रस्त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंपनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे,अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close