लाकूड कापताना पायावर आरामशीन पडून तरुण गंभीर जखमी : आर्थिक अडचणीमुळे उपचारासाठी हाल
डॉ.अजय कंकडालवार यांनी स्वतःची रुग्णवाहिका पाठवून केली मदत

अहेरी : गरिबीच्या झळा सोसत दिवस ढकलणाऱ्या कुटुंबावर नियतीने पुन्हा एकदा घाला घातला.वेलगूर टोला येथील सुरज संजय सडमेक हा तरुण सकाळी घरासाठी जळाऊ लाकूड आरा मशीनने कापत असताना मशीन स्लिप होऊन त्याच्या पायावर पडली.यात त्याच्या पायाला अत्यंत गंभीर व खोल जखम झाली.रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.तपासणी दरम्यान सुरजच्या पायातील महत्त्वाची नस कटल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.जखम अतिशय गंभीर असल्याने येथे पूर्ण उपचार होणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.त्याला तातडीने चंद्रपूर येथे मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आणि पेशंटला रेफर केले.ही माहिती डॉक्टरांनी सुरजच्या वडिलांना दिली.
सुरज समेक यांचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे.रोजंदारी करून कसेबसे घर चालवणाऱ्या वडिलांसमोर मुलाला मोठ्या शहरात उपचारासाठी नेणे हे मोठे आव्हान उभे ठाकले.रुग्णवाहिकेचा खर्च,प्रवास खर्च,औषधोपचाराचा खर्च कसा करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता.सरकारी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने कुटुंबीय हतबल झाले होते.मुलाच्या जीवाची काळजी आणि खिशात पैसा नाही या विवंचनेत वडील सापडले होते.
अशा निराशाजनक परिस्थितीत सुरजच्या वडिलांनी धाव घेतली ती जनतेच्या हाकेला नेहमीच धावून जाणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे.सध्या दौऱ्यावर असलेल्या अजयभाऊंना वडिलांनी फोन करून सर्व हकीकत सांगितली व मदतीची याचना केली.
जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होणाऱ्या अजयभाऊंनी विषयाचे गांभीर्य ओळखले.त्यांनी तात्काळ अहेरी येथील काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांना रुग्णालयात पाठवले.प्रशांत गोडसेलवार यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली,सुरजची परिस्थिती जाणून घेतली आणि संपूर्ण माहिती फोनवरून अजयभाऊ कंकडालवार यांना दिली.
समस्येची तीव्रता लक्षात घेऊन डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःची खासगी रुग्णवाहिका अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवली.या रुग्णवाहिकेतून सुरज समेक याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.
इतकेच नाही तर कंकडालवार यांनी सुरजच्या वडिलांना धीर देत सांगितले की, काळजी करू नका,तिकडे उपचारादरम्यान कोणतीही अडचण आली,पैशांची चणचण भासली किंवा कोणतीही मदत लागली तर थेट मला फोन करा.मी मदतीसाठी सदैव तयार आहे.तुमचा मुलगा लवकर बरा होऊन घरी येईल.अजयभाऊंच्या या शब्दांनी हतबल झालेल्या बापाच्या डोळ्यात आशेचा किरण तरळला.
या प्रसंगानंतर सुरजच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी डॉ.अजय कंकडालवार यांचे आभार मानले.आम्ही गरीब माणसं एवढ्या मोठ्या अडचणीत कोण मदत करणार? पण अजयभाऊ आमच्यासाठी देवासारखे धावून आले.त्यांनी वेळेवर रुग्णवाहिका दिली नसती तर आमच्या पोराचं काय झालं असतं माहित नाही.त्यांचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही,अशा भावना सुरजच्या वडिलांनी व्यक्त केल्या.
एकीकडे गरिबीमुळे उपचाराअभावी जीव गमावण्याची वेळ येते,तर दुसरीकडे अजयभाऊ कंकडालवार यांच्यासारखे नेते कोणताही गाजावाजा न करता गरजूंच्या मदतीला धावतात,हे चित्र समाजमन हेलावून टाकणारे आहे.निवडणुका आल्या की मत मागायला येणारे अनेकजण असतात,पण संकटाच्या काळात खऱ्या अर्थाने पाठीशी उभे राहणारे फार कमी, अशी चर्चा सध्या अहेरी तालुक्यात ऐकायला मिळत आहे.
डॉ.अजय कंकडालवार यांनी यापूर्वीही अनेक गरजू रुग्णांना आर्थिक मदत,रुग्णवाहिका सेवा, औषधोपचारासाठी सहकार्य केले आहे.जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे ब्रीद त्यांनी पुन्हा एकदा कृतीतून सिद्ध केले आहे.


