सिरोंचाच्या कोर्ला येथे तेंदूपत्ता वेचायला गेलेल्या कुटुंबाचे घर आगीत खाक : दीड लाखाचे नुकसान, अजय कंकडालवार यांची तात्काळ आर्थिक मदत

सिरोंचा : तालुक्यातील कोर्ला येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे.तेन्दूपत्ता वेचण्यासाठी संपूर्ण कुटुंब जंगलात गेले असता,पाठीमागे घराला आग लागून संपूर्ण संसार जळून खाक झाला.या दुर्घटनेत अन्नधान्य,कपडे,बियाणे व घरातील साहित्यासह सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे कोर्ला येथील लक्ष्मीबाई मलय्या तोगर (60) यांचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते.12 मे रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास लक्ष्मीबाई,मुलगा सत्यम तोगर (25),सून प्रतिभा तोगर (22) व लहान मुलगा संजय तोगर (23) हे सर्वजण सकाळी लवकर स्वयंपाक आटोपून तेन्दूपत्ता वेचण्यासाठी जंगलात गेले होते.
स्वयंपाक केल्यानंतर चुलीत राहिलेला विस्तव हवेच्या जोरदार प्रवाहामुळे भडकला आणि घराने पेट घेतला.कुटुंबातील सर्व सदस्य जंगलात असल्याने आग विझवायला कोणीच नव्हते.काही वेळातच संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
संपूर्ण कुटुंब जंगलात गेल्यामुळे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र घरातील धान्य,कपडे,भांडी,महत्वाची कागदपत्रे,शेतीसाठी ठेवलेले बी-बियाणे आणि संपूर्ण संसार जळून राख झाला.एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.
लक्ष्मीबाई तोगर यांचे कुटुंब अत्यंत गरीब आहे.मजुरी हाच त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार,डोक्यावरचे छप्परच गेल्याने आता कुटुंबासमोर जगण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.आता राहायचे कुठे,खायचे काय, हा प्रश्न पडला आहे,असे म्हणत लक्ष्मीबाई ढसाढसा रडत होत्या.
सदर घटनेची माहिती कोर्ला येथील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांना दिली.माहिती मिळताच डॉ.कंकडालवार यांनी तात्काळ तोगर कुटुंबाला आर्थिक मदत सुपूर्द केली.
या संकटाच्या काळात तुम्ही एकटे नाहीत.घर बांधण्यासाठी व संसार उभा करण्यासाठी लागेल ती सर्व मदत मी करीन. काळजी करू नका,असा धीर डॉ.कंकडालवार यांनी तोगर कुटुंबाला दिला.
या दुर्घटनेमुळे तोगर कुटुंब उघड्यावर आले आहे.महसूल व वन विभागाने तात्काळ घटनास्थळी पंचनामा करून शासनाकडून तोगर कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून द्यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तेन्दूपत्ता हंगामात कुटुंबातील सर्वजण जंगलात जातात.अशावेळी घरांची काळजी घेणारे कोणी नसते.त्यामुळे चुलीतील विस्तव,विद्युत उपकरणे याबाबत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी,असे आवाहनही करण्यात येत आहे.


