तेंदूपत्ता तोडायला जाताना बैलबंडीवरून पडून वेलगूरच्या महिलेचा पाय फ्रॅक्चर
माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील वेलगूर येथील रहिवासी सिंधुबाई झोडे (वय 52 वर्षे) ही महिला जंगलात नातेवाईकांसोबत तेंदूपत्ता तोडण्यासाठी बैलबंडीने जात असताना तोल जाऊन खाली पडल्या.या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावे लागले.या घटनेची माहिती मिळताच माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन औषधोपचारासाठी आर्थिक मदत केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू झाला आहे.वेलगूर येथील सिंधुबाई झोडे या आपल्या नातेवाईकांसह बैलबंडीने जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जात होत्या.वाटेत बैलबंडीला हादरा बसल्याने त्यांचा तोल गेला व त्या खाली कोसळल्या.पायावर जोरात आपटल्याने त्या जागेवरच वेदनेने विव्हळू लागल्या.
नातेवाईकांनी तात्काळ सिंधुबाईंना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तिथे एक्स-रे काढला असता पायाचे हाड पूर्णपणे तुटल्याचे निष्पन्न झाले.प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी रेफर केले.सध्या त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत.
माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार हे काल वेलगूर दौऱ्यावर होते.यावेळी गावातील कार्यकर्त्यांनी त्यांना सिंधुबाई झोडे यांच्या अपघाताची व त्या चंद्रपूरला भर्ती असल्याची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ.कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता सिंधुबाई यांच्या राहत्या घरी धाव घेतली.तिथे त्यांनी पेशंट महिलेच्या भावाची भेट घेऊन संपूर्ण घटना जाणून घेतली.कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचे लक्षात येताच त्यांनी पुढील औषधोपचारासाठी तात्काळ रोख आर्थिक मदत केली.
सिंधुबाई लवकर बऱ्या होतील.पैशांअभावी उपचार थांबणार नाहीत.आणखी काही मदत लागल्यास निसंकोचपणे कळवा असा धीर डॉ.अजय कंकडालवार यांनी कुटुंबीयांना दिला.त्यांच्या या माणुसकीच्या वागणुकीने कुटुंबीय भारावून गेले.
तेन्दूपत्ता हंगामात जंगलात जाताना महिलांचे,मजुरांचे असे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे.शासनाने व वन विभागाने मजुरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात,अशी मागणी आता होत आहे.



