तलवाडा येथे भीषण अपघात : महाकापाडी येथील पती-पत्नी जागीच ठार
17 वर्षीय युवक गंभीर जखमी; अजय कंकडालवार यांच्याकडून तात्काळ मदत

अहेरी : भामरागड तालुक्यातील महाकापाडी येथील एक दाम्पत्य आपल्या मुलीच्या भेटीसाठी अहेरी तालुक्यातील तलवाडा येथे आले होते.मुलीला भेटून दुचाकीने परत स्वगृही जात असताना अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.या अपघातात दुचाकीवरील 17 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे.
महाकापाडी येथील कुम्मा पुंगाटी व मिडको पुंगाटी हे दाम्पत्य आपल्या मुलीला भेटण्यासाठी तलवाडा येथे आले होते.त्यांच्यासोबत त्यांचा नातेवाईक आशिष चंदू माहाका (वय 17) हा युवकही होता.आशिष हा पुणे येथे शिक्षण घेत असून काही कामानिमित्त तलवाडा येथील नातेवाईकांकडे आला होता.
तलवाडा येथून तिघेही एकाच दुचाकीवरून महाकापाडीकडे निघाले.वाटेत अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कुम्मा व मिडको पुंगाटी या दाम्पत्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.तर आशिष माहाका हा गंभीर जखमी झाला.
या भीषण अपघाताची माहिती मेडपल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश वेलदी यांना मिळताच त्यांनी तात्काळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांना कळवली.माहिती मिळताच कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले.त्यांनी डॉक्टरांकडून जखमी आशिषच्या प्रकृतीची माहिती घेतली व मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
पुंगाटी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याचीही ऐपत कुटुंबाकडे नव्हती.ही बाब अजय कंकडालवार यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी तात्काळ पोस्टमॉर्टमसाठी लागणारे सर्व साहित्य स्वतः खरेदी करून दिले.
शवविच्छेदनानंतर मृतदेह स्वगृही महाकापाडी येथे नेण्यासाठी कुटुंबाकडे वाहनाची सोय नव्हती.आर्थिक अडचण मोठी होती.ही बाब समजताच कंकडालवार यांनी तातडीने चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले व दोन्ही मृतदेह सन्मानपूर्वक स्वगृही पाठवण्याची व्यवस्था केली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या 17 वर्षीय आशिष माहाका याला चंद्रपूर रेफर करण्यात आली आहे.चंद्रपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने महाकापाडी व तलवाडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अजय कंकडालवार यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे व तात्काळ केलेल्या मदतीमुळे नागरिकांतून त्यांचे आभार मानले जात आहेत.पोलीस विभाग अपघातास कारणीभूत अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.



