सिरोंच्यात काँग्रेसचा ‘डिजिटल बॉम्ब’ कोण.?अखेर नाव आलं समोर

अहेरी : आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसने गडचिरोली जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठी हालचाल करत सोशल मीडिया रणांगणासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभरातील तालुका स्तरावरील ब्लॉक कार्याध्यक्ष आणि सोशल मीडिया अध्यक्षांची घोषणा करताच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र सिरोंचा तालुक्यात एकाच नावाची सर्वाधिक चर्चा रंगली आणि अखेर त्या ‘डिजिटल बॉम्ब’चे नाव समोर आले संपत तिरुपती गोगूला
काँग्रेस पक्षाने संपतभाऊ गोगूला यांच्यावर सोशल मीडिया विभागाच्या सिरोंचा ब्लॉक अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत मोठा विश्वास दाखवला आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव सुरू आहे.
राजकीय घडामोडींमध्ये सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेता काँग्रेसने आता डिजिटल पातळीवर आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. बूथस्तरावरील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे,पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवणे आणि विरोधकांच्या प्रचाराला उत्तर देणे, ही मोठी जबाबदारी नव्या टीमवर सोपविण्यात आली आहे.
अहेरी, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, सिरोंचा, मुलचेरा, कुरखेडा, कोरची,गडचिरोली आणि एटापल्ली या तालुक्यांतील नव्या नियुक्त्यांमुळे काँग्रेस संघटनेला नवे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान,आता सोशल मीडियावर काँग्रेसचा आवाज आणखी बुलंद होणार,अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून आगामी काळात संपतभाऊ गोगूला यांच्या नेतृत्वाखाली सिरोंच्यात काँग्रेसची डिजिटल ताकद किती वाढते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



