एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली – वासामुंडी पुलियाच्या बांधकामासाठी 5 कोटींचा निधी
काँग्रेस नेते प्रज्वल नागूलवार यांच्या नाल्यात उतरून केलेल्या आंदोलनाला यश

एटापल्ली : तालुक्यातील मौजा मरपल्ली,वासामुंडी ते एटापल्ली दरम्यान येणाऱ्या धोकादायक पुलियाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.मागील 2 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मोठ्या पुलियाच्या बांधकामासाठी जिल्हाधिकारी यांनी 5 कोटी रुपयांचा निधी देण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.
मरपल्ली वासामुंडी ते एटापल्ली मध्ये येणारा पुलिया अत्यंत धोकादायक बनला असून,नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.या पुलियाबाबत गाववासीयांनी यापूर्वी मा.जिल्हाधिकारी साहेब,मा.उपविभागीय अधिकारी साहेब,तहसीलदार साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांना वारंवार निवेदने दिली होती.तसेच विद्यमान खासदार साहेबांच्या आढावा सभेत देखील हा मुद्दा रेटून धरण्यात आला होता व खासदार साहेबांनी सूचना देखील केल्या होत्या,परंतु बांधकाम विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात होते.
या पुलियामुळे मागील 2 वर्षात 3 निष्पाप युवकांचे जीव गेले आहेत. यामध्ये मरपल्ली येथील अंकुश पांडू कुळयेटी,वासामुंडी येथील मारोती शांताराम तलांडे,आणि तोडसा येथील एक युवक असे तिघे मृत्यूमुखी पडले असून अनेक युवक वाहून गेले होते,सुदैवाने ते बचावले.
हा पुलिया सूरजागड लोह पोलाद विभागाच्या 25 किलोमीटरच्या आत येत असल्याने जिल्हा खनिकर्म (DMF) योजनेतून तात्काळ 5 कोटी रुपये निधी देऊन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश काढावा,अन्यथा येत्या 15 दिवसात उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल व याला सर्वस्वी शासन-प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देणारे निवेदन दि. 4/9/2026 रोजी तालुका काँग्रेस नेते तथा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मरपल्ली श्री.प्रज्वल नागूलवार,उपाध्यक्ष नगर पंचायत एटापल्ली सौ.मीनाताई पोचरेड्डी नागूलवार,पाटील सुरज रघुनाथ लेकामी व इतर गावकरी यांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी,गडचिरोली यांना देण्यात आले होते.
याच मागणीसाठी तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागूलवार यांनी 9 ऑगस्ट रोजी थेट नाल्यात उतरून अनोखे आंदोलन केले होते.या आंदोलनाची दखल अखेर प्रशासनाने घेतली आहे.
जिल्हाधिकारी मा.अविशांत पंडा यांनी या आंदोलनाची दखल घेत मरपल्ली ब्रिजसाठी 5 कोटी रुपये निधी देणार असल्याचे ठोस आश्वासन दिले असून,पुढील 3 महिन्यात या पुलाचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे मरपल्ली,वासामुंडी,तोडसा व एटापल्ली परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.



