आलापल्ली-सिरोंचा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा ; झिमेला ब्रिजजवळ महाकाय खड्डा,चार तासांपासून वाहतूक ठप्प
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी

आलापल्ली : एकीकडे शासन विकासाच्या मोठमोठ्या गोष्टी करत असताना, दुसरीकडे अहेरी मतदारसंघातील आलापल्ली-सिरोंचा राज्य महामार्ग 153C मात्र वाहनचालकांसाठी ‘यमदूत’ बनला आहे.रस्ते विकास महामंडळाच्या निष्काळजीपणा आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या महामार्गाची पुरती वाताहत झाली आहे.
रस्त्याच्या मधोमध झिमेला ब्रिजजवळ अचानक महाकाय खड्डा पडल्याने गेल्या 4 तासांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.त्यामुळे शेकडो प्रवासी आणि मालवाहतूक करणारी वाहने रस्त्यावर अडकून पडली आहेत.
पावसामुळे जागोजागी रस्त्यावर माती वाहून आल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे झाले आहे.
या बिकट परिस्थितीबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.वारंवार आंदोलने आणि निवेदने देऊनही रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदाराच्या कानावर जूही रेंगाळत नाही. एसीमध्ये बसून कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एकदा या रस्त्यावरून प्रवास करून पाहावा, म्हणजे जनतेच्या वेदना त्यांना समजतील,असा जळजळीत सवाल त्यांनी केला.
झिमेला ब्रिजजवळील खड्डा इतका खोल आहे की, एखादे वाहन त्यात कोसळल्यास भीषण अपघात होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते,अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अवजड वाहनांच्या बेसुमार वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संतोष ताटीकोंडावार यांनी तातडीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याशी संपर्क साधून या मार्गावरील जीवघेणी अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली.
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत नागरिकांना अशाच जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागणार आहे.
प्रशासनाने तातडीने या रस्त्याची डागडुजी करून अवजड वाहतुकीवर बंदी घालावी, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमधून होत आहे.



