चिखलात ट्रक रुतल्याने अहेरी-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 6 तास ठप्प; प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप

गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग 353c वरील निकृष्ट बांधकामाचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे.अहेरी-सिरोंचा मार्गावरील मोसम-नंदिगाव गावाजवळील पुलाजवळ बुधवारी सायंकाळी चिखलात अवजड ट्रक रुतल्याने सायंकाळी 5 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
रस्त्याच्या दुतर्फा किलोमीटरभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि नोकरदार प्रवाशांना भर पावसात तासनतास खोळंबून राहावे लागले.
जिल्ह्याला तेलंगणा आणि आंध्रप्रदेशशी जोडणारा अहेरी-सिरोंचा 353C राष्ट्रीय महामार्ग गेल्या 6 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे.या महामार्गाच्या निकृष्ट बांधकामाबाबत सातत्याने तक्रारी होत असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
मोसम-नंदिगाव येथील पुलाजवळ कंत्राटदाराने मुरमाऐवजी माती टाकल्याने पावसामुळे संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच चिखलात बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एक अवजड ट्रक रुतला.मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.
रात्री उशिरापर्यंत ट्रक बाहेर काढण्यात अपयश आल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप
या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाहीन बांधकामाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पावसाळ्यात या मार्गावर वाहने अडकण्याचे प्रकार सातत्याने वाढले आहेत. मात्र तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
मागील सहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत अहेरी-सिरोंचा 353C या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. कंत्राटदाराकडून नियमांना तिलांजली देत निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जात आहे.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींबाबत प्रशासन आणि शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे सातत्याने कानाडोळा केला जात आहे. त्यामुळेच पावसाळ्यात या चिखलमय रस्त्यावर वाहने फसण्याचे प्रकार वाढले आहेत.
मागील सहा वर्षांपासून रस्ता पूर्णत्वास नेण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाविरोधात आता तीव्र लढा उभारण्याची वेळ आली आहे.



