हवामान खात्याचा इशारा : 14 ते 20 मे दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस व गारपिटीची शक्यता
शेतकऱ्यांनी 14 मे पूर्वी धान कापणी उरकावी,काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचे आवाहन

गडचिरोली : महाराष्ट्रात सध्या उन्हाचा कडाका वाढला असला तरी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आता हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.14 ते 20 मे दरम्यान राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या बदलत्या हवामानाचा फटका गडचिरोली जिल्ह्यालाही बसण्याची दाट शक्यता आहे.जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वारे,विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस व गारपीट होऊ शकते.त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना विशेष आवाहन केले आहे.ज्या शेतकऱ्यांची उन्हाळी धान कापणी बाकी आहे,त्यांनी 14 मे पूर्वी कापणी उरकून घ्यावी.कापलेले धान सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे.मळणी केलेले धान बाजारात नेऊन विक्री करावी किंवा गोदामात साठवावे,असे कंकडालवार यांनी सांगितले.
कंकडालवार पुढे म्हणाले,जोरदार वाऱ्यामुळे ग्रामीण भागात घरांवर,रस्त्यांवर झाडे कोसळण्याच्या घटना घडू शकतात. वीज पुरवठा खंडित होऊ शकतो.विजा पडण्याचाही धोका आहे.त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहावे.
नागरिकांनी घ्यायची काळजी
1.वादळी वाऱ्यादरम्यान झाडाखाली, पत्र्याच्या शेडखाली किंवा कच्च्या घरात थांबू नये.
2. शेतातील कामे शक्यतो सकाळी लवकर उरकून घ्यावीत. दुपारनंतर शेतावर जाणे टाळावे.
3. जनावरांना मोकळ्यावर बांधू नये.सुरक्षित गोठ्यात बांधावे.
4. विजा चमकत असताना मोबाईलचा वापर करू नये. इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत.
5. घरावरील पत्रे, सोलर पॅनल इत्यादी वस्तू व्यवस्थित बांधून घ्याव्यात.
6. नदी-नाल्यांच्या काठावर जाणे टाळावे.पुराचा धोका असलेल्या भागातील नागरिकांनी सावध राहावे.
“आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महावितरण,आरोग्य विभाग व महसूल प्रशासनाने या काळात सतर्क राहावे.कुठेही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ मदत मिळेल याची व्यवस्था करावी,अशी मागणीही कंकडालवार यांनी केली आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.त्याचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी.नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे,असे आवाहन अजय कंकडालवार यांनी शेवटी केले.



