व्येंकटरावपेठा येथे तुळशी विवाह थाटात संपन्न ; कंकडालवार परिवाराकडून भाविकांना महाप्रसाद वाटप

अहेरी : कार्तिक महिन्यातील पवित्र पर्व,तुळशी विवाह निमित्त व्येंकटरावपेठा येथे आज भक्ती,श्रद्धा आणि उत्साहाचा अपूर्व संगम पाहायला मिळाला.जय हनुमान भजन मंडळ व काकड आरती सेवा समिती,व्येंकटरावपेठा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तुळशी विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात थाटामाटात आणि आनंदात संपन्न झाला.
सकाळपासूनच गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.महिलांनी पारंपरिक वेशात,तुळशी वृंदावनाची आकर्षक सजावट केली होती.फुलांची आरास,रांगोळी,दीपमाळा आणि भजनाच्या सुरांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.पारंपरिक रितीरिवाजानुसार,विधिवत पूजा-अर्चा करून तुळशी माता व भगवान श्री विष्णू यांचा विवाह सोहळा पार पडला.यावेळी मंत्रोच्चार,भजन,कीर्तन आणि काकड आरतीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.उपस्थित भाविकांनी तुळशी मातेला मनोभावे वंदन करत गावाच्या सुख-समृद्धीसाठी, पिक-पाण्यासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
तुळशी विवाह हा केवळ धार्मिक विधी नसून तो आपल्या संस्कृतीचा,परंपरेचा आणि श्रद्धेचा प्रतीक आहे.याची प्रचिती आज व्येंकटरावपेठा येथे आलेल्या प्रत्येक भाविकाला आली.या पवित्र सोहळ्यानिमित्त माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा महासचिव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.डॉ.कंकडालवार यांनी स्वतःच्या हस्ते भाविकांना महाप्रसाद वाटप केला.शेकडो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी डॉ.कंकडालवार यांनी तुळशी विवाहाच्या सर्वांना शुभेच्छा देत,गावातील एकोपा,परंपरा आणि भक्ती जपण्याचे काम जय हनुमान भजन मंडळ व काकड आरती सेवा समिती करत असल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.त्यानंतर कंकडालवार दाम्पत्यांनी बजरंगबली भगवान हनुमान मंदिरात विधिवत पूजा-अर्चना करून दर्शन घेतले.यावेळी त्यांनी गावाच्या सुख-शांतीसाठी,सर्व नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी बजरंगबली चरणी प्रार्थना केली.
या सोहळ्याला व्येंकटरावपेठा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच शामराव राऊत,माजी ग्रामपंचायत सदस्य मिनाताई गर्गम,नरेंद्र गर्गम,माधव राऊत,शंकर सिडाम,राकेश चिंचोलकर,हरीबाबा राऊत,व्यंकटेश राऊत,व्यंकटेश चिलंकर,मनोज चिलंकर,हनमंतू चापले,राजू सिडाम,श्रीनिवास आत्राम,रवि कुळमेथे यांच्यासह जय हनुमान भजन मंडळाचे पदाधिकारी,गावातील ज्येष्ठ नागरिक,महिला,युवक,काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम भक्तिभावाने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि अत्यंत उत्साहात पार पडला.शेवटी आयोजकांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे,भाविकांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.



