थकीत वेतनासाठीच्या आंदोलनाला यश, अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात विजय

अहेरी : तालुक्यातील मध्यवर्ती काष्ठ भांडार क्र.1 मधील हंगामी मजूर,चौकीदार,गटबांधणी तसेच मोजमाप कामगारांचे गेल्या तब्बल पाच महिन्यांपासून वेतन थकीत होते.वारंवार मागणी करूनही वेतन मिळत नसल्याने संतप्त कामगारांनी दि.22 ऑक्टोबर 2026 पासून साखळी उपोषणाचे हत्यार उपसले होते.
थकीत वेतन तात्काळ खात्यात जमा होईपर्यंत एकही कामगार कामावर हजर होणार नाही,अशी आक्रमक भूमिका कामगारांनी घेतली होती.पाच महिने काम करूनही हातात एक रुपयाही न मिळाल्याने कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती.सणासुदीच्या काळातही वेतन न मिळाल्याने कामगारांमध्ये प्रचंड नाराजी होती.
या आंदोलनाची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव,गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी तात्काळ उपोषण मंडपाला भेट देऊन आंदोलक कामगारांशी संवाद साधला व या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला होता.
यावेळी कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर अजयभाऊंनी संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले होते.तसेच त्यांनी त्याचवेळी माजी कॅबिनेट मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून येथील कामगारांची संपूर्ण अडचण सांगितली होती.
विजुभाऊ वडेट्टीवार यांच्या पाठपुराव्यामुळे आणि अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात वनमजुरांनी केलेल्या प्रभावी उपोषणामुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि कामगारांचे पाच महिन्यांचे थकीत वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.थकीत वेतन मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वेतन मिळाल्यानंतर आज सर्व आंदोलनकर्त्या कामगारांनी अहेरी येथील अजयभाऊ कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी पेळे व पुष्पगुच्छ देऊन अजयभाऊंचा सत्कार केला आणि मनापासून आभार मानले.
यावेळी कामगार म्हणाले,अजयभाऊ तुम्ही आमच्या उपोषणाला पाठिंबा देऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात आणि विजयभाऊंकडे आमचा प्रश्न लावून धरलात म्हणूनच आज आम्हाला आमच्या घामाचा पैसा मिळाला.तुम्हीच खरे कामगारांचे कैवारी आहात.कामगारांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अजयभाऊंनी देखील त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित विजय काटेल,रगू येलकलू,सत्यवान आत्राम,भीमराव कोसरे,सागर काटेल,सुरज कुळमेते,रवी गज्जलवार,मुकेश सिडाम,दिनेश कतलामी,महेश मेश्राम,बजरंग कुमराम,सागर आत्राम,नागेश आत्राम,सुरज येलपूलवार,जितेंद्र मडावी यांच्या सह आदी उपस्थित होते.



