वर्षभरापासून सिंचन विहिरीचे बिल थकीत,शेतकरी आर्थिक संकटात – माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन

मुलचेरा : तालुक्यातील शेतकऱ्यांना विकसित भारत- जी राम जी (VB-G RAM G) योजनेचा मोठा फटका बसला असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.सन २०२४-२०२५ या वर्षातील वैयक्तिक सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण करून एक वर्षाचा कालावधी उलटूनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कुशल बिलाचे देयक मिळालेले नाही.याबाबत शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा प्रभारी अर्जुनी – मोरगाव विधानसभा डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
विकसित भारत- जी राम जी (पूर्वीचे नाव मगरारोहयो) या योजनेअंतर्गत मुलचेरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशाने व कर्ज काढून वैयक्तिक सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण केले आहे.शासनाच्या नियमानुसार विहीर पूर्ण झाल्यानंतर कुशल कारागिराचे बिल देयक शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे.
मात्र,विहिर बांधून एक वर्ष होऊनही अद्याप एक रुपयाही मिळाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.शेतकऱ्यांनी याबाबत पंचायत समिती,मुलचेरा येथे जाऊन अधिकारी वर्गाला विचारणा केली असता,शासनाकडून अजून पर्यंत निधी उपलब्ध झाला नाही असे सांगण्यात आले.
यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी खोदल्या,त्यांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत असून,शेतीसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर त्रस्त शेतकऱ्यांनी आज दि.५ नोव्हेंबर २०२६ रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की,आम्ही शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण करून एक वर्ष कालावधी होऊन सुद्धा अजून पर्यंत कुशल बिल देयके मिळालेले नाही.आम्हा शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.करिता आपणास नम्र विनंती करण्यात येत आहे की याबाबत योग्य चौकशी करून आम्हा शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचे कुशल बिल देयके बाबत शासनाकडे पाठपुरावा करून मिळवून देण्यास मदत कराल.
निवेदन स्वीकारल्यानंतर अजयभाऊ कंकडालवार यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले असून,याबाबत लवकरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे थकीत बिले तात्काळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
शासनाने निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा,अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल,अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.



