एटापल्ली तालुक्यात नरभक्षक वाघाची दहशत; दिंडवी येथे वृद्ध शेतकऱ्याचा बळी?
वनविभागाने तात्काळ कारवाई करावी, काँग्रेस नेते प्रज्वलभाऊ नागूलवार यांची मागणी

एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल एटापल्ली तालुक्यात नरभक्षक वाघाने पुन्हा एकदा थैमान घातले असून,संपूर्ण तालुक्यात मृत्यूची आणि दहशतीची लाट पसरली आहे.जारावंडी परिसरात वाघाच्या हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, गेल्या अवघ्या 15 दिवसांतील ही तिसरी मन हेलावून टाकणारी घटना आहे.
जारावंडी पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम दिंडवी गावातील ६८ वर्षीय गरीब आदिवासी शेतकरी सदाशिव दुग्गा हे नेहमीप्रमाणे सोमवारी (दि.२ नोव्हेंबर) दुपारी आपल्या शेतात बैल चारण्यासाठी गेले होते.दिवसभर शेतात काम करून सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास ते परत येण्याच्या तयारीत असताना, शेताच्या बांधावर दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने त्यांच्यावर अचानक पाठीमागून जीवघेणा हल्ला केला.
अचानक झालेल्या या भयंकर हल्ल्यात वयोवृद्ध दुग्गा यांना आरडाओरडा करण्याची किंवा बचावाची संधीही मिळाली नाही.वाघाने त्यांच्या नरडीचा घोट घेत त्यांना जागीच ठार केले.एवढ्यावरच न थांबता,नरभक्षक वाघाने त्यांचा मृतदेह सुमारे ५०० मीटरपर्यंत फरफटत जंगलात नेले, त्यामुळे त्यांच्या शरीराची छिन्नविच्छिन्न अवस्था झाली होती. या घटनेने संपूर्ण दिंडवी आणि जारावंडी परिसर हादरून गेला आहे. मृत सदाशिव दुग्गा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि लहान नातवंडे असा मोठा परिवार असून, कुटुंबाचा आधारच हिरावल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जारावंडी परिसरात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी काही दिवसांपूर्वीच डोलंदा येथील ५७ वर्षीय बोहरण वड्डे आणि १९ ऑक्टोबर रोजी इरपनपायली येथील ७० वर्षीय बिलाशी आनंद बा यांचा अशाच प्रकारे वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता सदाशिव दुग्गा यांच्या मृत्यूने या परिसरातील वाघाच्या हल्ल्यातील बळींची संख्या तीनवर पोहोचली असून,प्रशासन मात्र सुस्त आहे, असा आरोप नागरिक करीत आहेत.
सतत होणाऱ्या या जीवघेण्या हल्ल्यांमुळे आता शेतात जाणे, भात कापणी करणे, तेंदूपत्ता संकलन आणि जनावरे चारणेही जीवघेणे ठरू लागले आहे. दिवसाढवळ्या वाघ फिरत असल्याने महिला आणि लहान मुलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, लोकांनी शेतात जाणेच बंद केले आहे. यामुळे शेतीचे आणि जनावऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
काँग्रेस नेते प्रज्वलभाऊ नागूलवार यांचा आक्रमक पवित्रा
या गंभीर घटनेची माहिती मिळताच युवकांचे आशास्थान, गोरगरीब आदिवासींचे कैवारी, काँग्रेस नेते मा.प्रज्वलभाऊ नागूलवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले आणि प्रशासनाला धारेवर धरले.
यावेळी बोलताना प्रज्वलभाऊ नागूलवार म्हणाले,एटापल्ली तालुक्यातील आदिवासी बांधवांचा जीव हा वनविभागासाठी स्वस्त झाला आहे का? गेल्या 15 दिवसांत तीन निष्पाप लोकांचा बळी गेला,तरीही वनविभाग केवळ पंचनामा करण्यापुरताच मर्यादित आहे. पिंजरा लावणे, गस्त घालणे यासारख्या ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत?
प्रज्वलभाऊंच्या प्रमुख मागण्या
१.या नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करून अन्यत्र स्थलांतरित करावे.२.जारावंडी, दिंडवी, डोलंदा, इरपनपायली परिसरात वनविभागाची २४ तास गस्त वाढवावी आणि तात्पुरते पिंजरे लावावेत.३.मृत सदाशिव दुग्गा यांच्या कुटुंबाला तात्काळ २५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे.४.यापूर्वी मृत्यू झालेल्या बोहरण वड्डे आणि बिलाशी आनंद बा यांच्या कुटुंबियांनाही तात्काळ मदत द्यावी.
जर पुढील काही तासात वनविभागाने ठोस कारवाई केली नाही,तर गरीब आदिवासींच्या न्यायासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने एटापल्ली तहसील आणि वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि रस्ता रोको करण्यात येईल,याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल,असा कडक आणि आक्रमक इशारा प्रज्वलभाऊ नागूलवार यांनी दिला आहे.
त्यांच्या या भूमिकेचे संपूर्ण एटापल्ली तालुक्यातील नागरिकांकडून जोरदार स्वागत होत असून, आदिवासींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.



