Uncategorized

अहेरी तालुक्यातील गोलाकर्जी-रेपनपल्ली मुख्य मार्गाची दैना

प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात काँग्रेसचा एल्गार, उद्या छल्लेवाडा येथे धान रोवणी व रस्ता रोको आंदोलन

अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी बहुल भागाला जोडणारा गोलाकर्जी-रायगट्टा-राजाराम-छल्लेवाडा-कोळसेलगुडम-कमलापूर-रेपनपल्ली हा २० ते २५ किमीचा मुख्य रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यामुळे या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. या गंभीर समस्येकडे जिल्हा परिषद प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस पक्षाने आता थेट जनआंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.

या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.गडचिरोली यांना लेखी निवेदन देऊन रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी केली होती.तसेच ७ दिवसांच्या आत खड्डे न बुजविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता.

डॉ.कंकडालवार यांनी दिलेला ७ दिवसांचा अल्टिमेटम संपूनही प्रशासनाने एक इंचही रस्ता दुरुस्त केलेला नाही.निवेदन देऊनही एकही अधिकारी पाहणीसाठी आला नाही. प्रशासनाच्या या मुजोर भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.शाळकरी विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखलातून शाळा गाठावी लागत असून, गरोदर महिला व गंभीर रुग्णांना वेळेवर दवाखान्यात नेता येत नसल्याची धक्कादायक परिस्थिती आहे.

उद्या भव्य जनआंदोलन

प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे अखेर उद्या,मंगळवार दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता, छल्लेवाडा-कमलापूर दरम्यानच्या सर्वात मोठ्या खड्ड्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य जनआंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात रस्त्यावर साचलेल्या चिखल व खड्ड्यात प्रतीकात्मक धान रोवणी आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार असून,त्यानंतर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

या जनआंदोलनाचे नेतृत्व डॉ.अजयभाऊ कंकडालवार हे करणार असून या आंदोलनाला गोलाकर्जी,रायगट्टा, राजाराम,छल्लेवाडा, कमलापूर,रेपनपल्ली व कोळसेलगुडम परिसरातील आजी-माजी सरपंच,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य,शेतकरी बांधव,शेतमजूर,सर्व विभागातील कर्मचारी, विद्यार्थी तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख मागण्या 

1.पावसाळ्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ खड्डे बुजवावे.2.गोलाकर्जी ते रेपनपल्ली या संपूर्ण रस्त्यासाठी नवीन डांबरी रस्ता मंजूर करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.

या आंदोलनानंतरही प्रशासनाने जाग न झाल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ.अजय कंकडालवार यांनी दिला आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close