शेतकऱ्यांची लूट थांबवा, खत-बियाणे मुबलक द्या : संतोष ताटीकोंडावार यांची मागणी

गडचिरोली : खरीप हंगामात जिल्ह्यात खत व बियाणांचा तुटवडा होऊ नये,यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती समितीने अहेरीचे तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जून महिना सुरू होताच शेतकऱ्यांना बियाणे व रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते.मात्र,ऐन हंगामात अनेकदा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.बियाणे व खते खरेदी करताना शेतकऱ्यांची लूट होणार नाही,यासाठी कृषी विभागाने सतर्क राहावे,असे समितीचे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात व दर्जेदार कृषी साहित्य उपलब्ध करून द्यावे,अशी मागणीही करण्यात आली आहे.तसेच बाजारात कृत्रिम टंचाई,काळाबाजार आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्या नफेखोरांवर कृषी विभागाने नियमित तपासणी करून कठोर कारवाई करावी,जेणेकरून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुकर होईल,असे निवेदनात नमूद केले आहे.
सदर निवेदन अहेरी तहसीलदारांमार्फत जिल्हा कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.खरीप पेरणीच्या तोंडावर बियाणे व खतांचा काळाबाजार रोखून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.



