अहेरीतील पचाही तालुक्यात उन्हाळी धान व मका खरेदी तात्काळ सुरू करा
पावसाआधी पिके भिजण्याची भीती,डॉ.अजय कंकडालवार यांची मागणी

अहेरी : विधानसभा क्षेत्रातील पचाही तालुक्यातील शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेले उन्हाळी धान व मका शेतातच पडून आहे. वातावरणात बदल होत असून अवकाळी पावसाची शक्यता वाढल्याने धान व मका पूर्णपणे नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे लवकरात लवकर शासकीय धान व मका खरेदी केंद्र सुरू करावे,अशी जोरदार मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव,माजी जि.प.अध्यक्ष व माजी संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी डॉ.अजय कंकडालवार यांनी केली आहे.
पचाही तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उन्हाळी धान व मकाची लागवड केली होती. कडक उन्हात राबून, पाण्यासाठी धडपड करून हे पीक घेतले.आता कापणी होऊन धान-मका शेतात खळ्यावर पडून आहे. खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
हवामान खात्याने पुढील आठवड्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.जर पाऊस आला तर शेतात उघड्यावर पडलेले धान-मका पूर्णपणे भिजून जाईल.धानाला कोंब फुटतील, मक्याला बुरशी लागेल,ते काळे पडेल व खाण्यायोग्य राहणार नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट व लाखों रुपयांचे नुकसान एका पावसात वाया जाईल.
डॉ. कंकडालवार यांनी सांगितले की,जर शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नाही,तर नाईलाजाने शेतकऱ्याला खासगी व्यापाऱ्यांना धान व मका विकावा लागेल.व्यापारी पावसाचे कारण सांगून कमी दरात माल मागतील. शासनाचा आधारभूत भाव जास्त असल्याने शेतकऱ्याला प्रति क्विंटल हजारो रुपयांचा तोटा सहन करावा लागेल.आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल.
गेल्यावर्षी खरेदी केंद्रावर बारदाना तुटवडा व वाहतूक कंत्राटदाराच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे हाल झाले होते. यावर्षी प्रशासनाने आधीच बारदाना,काटा,मजूर व वाहतुकीची व्यवस्था करून ठेवावी,जेणेकरून खरेदी सुरू झाल्यावर गोंधळ होणार नाही, अशी मागणीही डॉ. कंकडालवार यांनी केली.
तसेच अनेक शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी अद्याप झालेली नाही. सर्व्हर डाऊन, तांत्रिक अडचणी यामुळे शेतकरी परेशान आहेत.ऑनलाइन नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांचे धान व मका सुद्धा खरेदी करण्यात यावे. नोंदणीची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी त्यांनी केली.
डॉ.अजय कंकडालवार यांचा इशारा
पचाही तालुका नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल तालुका आहे.इथला शेतकरी कष्टाळू आहे. शासनाने त्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. पुढील दोन-तीन दिवसांत धान व मका खरेदी सुरू न झाल्यास शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करू, असा इशारा डॉ.अजय कंकडालवार यांनी दिला आहे.
शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसणे हीच खरी शासनाची जबाबदारी आहे.पावसाळ्यापूर्वी धान व मका खरेदी करून शेतकऱ्याला दिलासा द्यावा, अशी संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रातून मागणी होत आहे.



