चिरेपल्ली येथील युवक अमित मडावीच्या मदतीला धावले अजय कंकडालवार; रुग्णवाहिकेद्वारे चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात केले रवाना

अहेरी : तालुक्यातील चिरेपल्ली येथील युवक अमित राजू मडावी याचा काही महिन्यांपूर्वी ट्रॅक्टरवर काम करीत असताना अपघात होऊन पायाला गंभीर दुखापत झाली होती. पाय मोडल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते,मात्र दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला तात्काळ ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला होता.
मडावी परिवाराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची (गरीब) असल्याने अमित मडावी याला ऑपरेशनसाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी वाहनाची अडचण भासत होती. त्यामुळे त्याचे ऑपरेशन लांबणीवर पडले होते.
ही माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांना समजताच त्यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला.
अजय कंकडालवार यांनी स्वतःची रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन जखमी युवक अमित मडावी याला उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली.
यावेळी त्यांनी मडावी कुटुंबाला धीर देत,चंद्रपूर येथे उपचारादरम्यान काहीही अडचण आल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा असे सांगितले.अजयभाऊ कंकडालवार यांनी केलेल्या या मदतीबद्दल चिरेपल्ली परिसरातून व मडावी परिवाराकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे.



