अखेर नागरिकांनीच सावरला कमलापूर-रेपणपल्ली’रस्ता प्रशासनाच्या दुर्लक्षावर
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा लोकसहभागातून झनझणीत प्रहार

कमलापूर : कमलापूर ते रेपणपल्ली दरम्यानचा मुख्य रस्ता मागील अनेक महिन्यांपासून पूर्णपणे खड्डेमय झाला होता.सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त झाले होते.अखेर संतप्त झालेल्या नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून या रस्त्याची डागडुजी केली.प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर हा एक प्रकारे झनझणीत अंजन आहे.
कमलापूर आणि रेपणपल्ली परिसरातील हजारो नागरिकांसाठी हा रस्ता दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे.मात्र रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले होते.चारचाकी वाहनांचे देखील मोठे नुकसान होत होते.पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने हा रस्ता आहे की तलाव अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत संबंधित प्रशासनाकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्या.रस्ता दुरुस्तीसाठी निवेदने देखील दिली.मात्र प्रशासनाने नेहमीच काणाडोळा’ केला.वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांचा संयम सुटला.
संतोष ताटीकोंडावार यांचा पुढाकार
प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरिकांना होणारा त्रास असह्य झाल्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी पुढाकार घेतला.त्यांनी स्थानिक नागरिकांना एकत्र केले आणि लोकसहभागातून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला.
स्वखर्चातून आणि गावकऱ्यांच्या मदतीने खडी,माती टाकून या धोकादायक रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात आली.यामुळे आता प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे पाऊल” – संतोष ताटीकोंडावार
याबाबत बोलताना संतोष ताटीकोंडावार म्हणाले, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव धोक्यात होते.प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही उपयोग होत नव्हता.जनसामान्यांच्या सोयीसाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेऊन हा रस्ता दुरुस्त केला आहे. प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे एक छोटेसे पाऊल आहे.
लोकांनी स्वतःच्या पैशातून रस्ता दुरुस्त करावा लागल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप आहे.ही डागडुजी तात्पुरती असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करावी,अशी मागणी आता जोर धरत आहे.



