Uncategorized

दक्षिण गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा

आलापल्ली–पातागुडम राष्ट्रीय महामार्ग, हत्ती कॅम्पमधील पर्यटन व स्थानिक रोजगारावर सकारात्मक चर्चा

गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेले मा.जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्याशी सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी परिसराच्या विकासाशी निगडित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा केली. यावेळी प्रामुख्याने आलापल्ली–पाटागुडम राष्ट्रीय महामार्गाचे काम, कमलापूर येथील हत्ती कॅम्पचा पर्यटनदृष्ट्या विकास, पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा आणि स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती या विषयांवर भर देण्यात आला.

आलापल्ली–पातागुडम महामार्गाबाबत गंभीर चर्चा

दक्षिण गडचिरोलीच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आलापल्ली ते पाटागुडम राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी गंभीर चर्चा केली. या रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, शासकीय अधिकारी-कर्मचारी, व्यापारी आणि प्रवाशांना होणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधण्यात आले.या चर्चेदरम्यान संबंधित काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सकारात्मक आश्वासन देण्यात आले. महामार्गाचे काम वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्यास दक्षिण गडचिरोलीच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पच्या विकासावर विशेष चर्चादौऱ्यादरम्यान मा. जिल्हाधिकारी यांनी कमलापूर येथील महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्पला भेट दिली.

हत्ती कॅम्प हे गडचिरोली जिल्ह्याच्या पर्यटनाचे महत्त्वाचे आकर्षण असून, येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा निर्माण करण्याबाबत चर्चा झाली.

हत्ती कॅम्पचा निसर्ग व वन्यजीवांचे संवर्धन कायम राखून पर्यटनदृष्ट्या विकास केल्यास देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढू शकते. त्याचबरोबर स्थानिक युवक,महिला व आदिवासी बांधवांना पर्यटनाशी निगडित रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील, यावरही सकारात्मक विचारमंथन झाले.

स्थानिक युवकांना पर्यटन मार्गदर्शक, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला व वनउपज विक्री, पर्यटकांसाठी आवश्यक सेवा तसेच इतर पूरक व्यवसायांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची मोठी क्षमता या परिसरात असल्याचे चर्चेत अधोरेखित करण्यात आले.

दौऱ्यादरम्यान मा. जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी हत्तींना स्वतः फळे खाऊ घातली आणि हत्ती कॅम्पची पाहणी केली. त्यामुळे उपस्थित नागरिक आणि पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी उपवनसंरक्षक नावकिशोर रेड्डी, उपविभागीय वनाधिकारी विषुवर्धन रेड्डी, उपविभागीय अधिकारी पिसाळ साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर सालोडकर, उपविभागीय अभियंता आर. के. पारेलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक नागरिक व पर्यटक उपस्थित होते.दक्षिण गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील प्रश्न प्रत्यक्ष दौऱ्यातून समजून घेणे, नागरिकांशी संवाद साधणे आणि विकासाच्या शक्यतांवर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणे ही बाब सकारात्मक असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

दक्षिण गडचिरोलीमध्ये निसर्ग, वन्यजीव आणि पर्यटनाची मोठी क्षमता आहे. त्यासोबत चांगले रस्ते व मूलभूत सुविधा निर्माण झाल्यास पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून या भागाचा शाश्वत विकास साधता येईल, अशी भावना सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी व्यक्त केली.मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे आलापल्ली–पातागुडम राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळण्यासह कमलापूर हत्ती कॅम्पच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close