येरमनार येथील अर्धवट पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन
काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

अहेरी : तालुक्यातील येरमनर येथील पुलाचे बांधकाम गेल्या 5 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.हे बांधकाम तात्काळ चालू करून पूर्ण करावे,अन्यथा पुलाजवळ किंवा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.कंकडालवार यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,येरमनार येथील पुलाचे बांधकाम 5 वर्षांपासून अर्धवट ठेवण्यात आले आहे.याबाबत वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागाच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला,मात्र अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एप्रिल,मे 2026 मध्ये काम चालू करण्याचे आश्वासन दिले होते,परंतु त्यानंतरही काम सुरू झाले नाही.
त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून,हा पूल तात्काळ पूर्ण करावा,अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही,असा इशारा डॉ.कंकडालवार यांनी दिला आहे.या निवेदनाची प्रत त्यांनी कार्यकारी अभियंता गडचिरोली यांनाही देण्यात आली आहे.



