बिरसा मुंडा हेच आमचे प्रेरणास्थान…अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन
आलापल्लीत जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात

आलापल्ली : आपल्या क्रांतिकारी विचारांनी आदिवासींच्या जीवनाला नवी दिशा देणारे,जल,जंगल,जमीनसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जिल्ह्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर आदिवासी उत्सव सेवा समिती,आलापल्ली यांच्या वतीने आलापल्ली येथे भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार उपस्थित होते.त्यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.अजयभाऊ कंकडालवार म्हणाले,भगवान बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजाचे नव्हे,तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत.इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षीच मोठा लढा उभारला.जल,जंगल,जमीन यांच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान आजही आपल्याला प्रेरणा देतो.त्यांचे विचार,त्यांची क्रांतिकारी भूमिका आजच्या युवकांनी आत्मसात करून समाजाच्या विकासासाठी पुढे यायला हवे.आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी मी नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहीन.त्यांच्या या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
यावेळी आदिवासी समाजातील महिला व युवकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आदिवासी नृत्य सादर केले. ढोल-ताशांच्या गजरात,भगवान बिरसा मुंडा की जय,च्या घोषणांनी संपूर्ण आलापल्ली परिसर दणाणून गेला होता.कार्यक्रमस्थळी उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी आदिवासी समाजातील मान्यवर,स्थानिक काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने आदिवासी बांधव,महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी उत्सव सेवा समिती, आलापल्ली यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.त्यांच्या नियोजनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



