कल्लेम – येलचील गाव अजूनही विकासापासून वंचित : काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांना निवेदन

अहेरी : देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण झाली.देशाने चांद्रयानापासून ते डिजिटल इंडियापर्यंत मोठी प्रगती केली.मात्र अहेरी तालुक्यातील कल्लेम ते येलचील या गावातील नागरिक आजही पक्क्या रस्त्यासाठी झगडत आहेत,ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे.
कल्लेम ते येलचील या मार्गावर आतापर्यंत रस्ता बांधकाम करण्यात आलेलेच नाही.त्यामुळे या दोन्ही गावातील हजारो ग्रामस्थांना दररोज नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
कच्च्या आणि खड्डेमय रस्त्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.पावसाळ्यात तर हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होतो.चिखलातून पायवाट काढत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना,शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
सर्वात गंभीर समस्या म्हणजे आरोग्याची.गावात एखादा व्यक्ती गंभीर आजारी पडला,किंवा गरोदर महिलेला दवाखान्यात घेऊन जायच असेल तर रस्ता नसल्यामुळे वेळेवर दवाखाना गाठता येत नाही.अनेकदा रुग्णांना खाटेवरून किंवा दुचाकीवरून जीव मुठीत घेऊन न्यावे लागते.शेतमाल बाजारात नेण्यासाठी देखील शेतकऱ्यांना मोठा खर्च आणि त्रास सहन करावा लागतो.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ रस्त्याच्या मागणीसाठी प्रशासनाच्या दारात खेटे घालत आहेत.प्रत्येक निवडणुकीत नेते येतात,आश्वासन देतात आणि निवडणूक संपली की विसरून जातात.केवळ आश्वासनांवरच ग्रामस्थांची बोळवण केली जात आहे.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे.
आता तरी आम्हाला न्याय मिळावा, आमच्या गावाला पक्का रस्ता मिळावा,या मागणीसाठी कल्लेम आणि येलचील येथील ग्रामस्थांनी एकत्र येत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेतली.यावेळी ग्रामस्थांनी आपल्या सर्व व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या आणि लेखी निवेदन सादर केले.
यावेळी ग्रामस्थ म्हणाले,आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत.आम्हाला सुद्धा चांगल्या रस्त्यावर चालण्याचा अधिकार आहे.स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही आम्हाला रस्त्यासाठी भटकावे लागत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही.
यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी ग्रामस्थांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.रस्त्याच्या प्रश्नासाठी आपण पाठपुरावा करू,असे आश्वासन त्यांनी यावेळी दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
रस्त्याचे बांधकाम तातडीने सुरू करावे,अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे.आता प्रशासन या मागणीकडे लक्ष देते का,की पुन्हा एकदा ग्रामस्थांना केवळ आश्वासन मिळते,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



