खेळातूनच आदर्श युवा पिढी घडेल ! अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन
चुट्रूगुंठा येथील आदर्श क्रीडा मंडळाचा उपक्रम...चुट्रूगुंठात रंगला व्हॉलीबॉलचा थरार

मुलचेरा : आदर्श क्रीडा मंडळ, चुटूगुंटा यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या भव्य स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी त्यांनी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उदघाटनीय भाषणात बोलताना डॉ.अजयभाऊ कंकडालवार म्हणाले,ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रचंड ताकद आणि प्रतिभा आहे.फक्त त्यांना योग्य व्यासपीठ मिळण्याची गरज आहे.अशा स्पर्धांमुळे युवक व्यसनापासून दूर राहून खेळाकडे वळतात.खेळातून शिस्त,एकता,जिद्द आणि नेतृत्व गुण निर्माण होतात.ग्रामीण खेळाडूंना पुढे नेण्यासाठी मी नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहीन.त्यांच्या या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध संघांमध्ये अत्यंत चुरशीच्या आणि रोमहर्षक लढती पाहायला मिळाल्या.प्रत्येक गुणासाठी खेळाडू जीवाचे रान करत होते.स्मॅश,सर्व्हिस आणि ब्लॉकच्या जोरावर खेळाडूंनी प्रेक्षकांची मने जिंकली.मैदानाभोवती जमलेल्या शेकडो प्रेक्षकांनी टाळ्या,शिट्ट्या वाजवत खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला.लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून देण्यात आले आहे.द्वितीय पारितोषिक चुटूगुंटाचे ग्रामविकास अधिकारी बावाणकर मॅडम,ग्रामपंचायत सरपंच साधना मडावी व उपसरपंच सुरेश आत्राम यांच्याकडून देण्यात येत आहे.तर तृतीय पारितोषिक तंटामुक्ती अध्यक्ष वेंकटेश धानोरकर,रोजगार सेवक विकास सेडमाके व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता मॅडम यांच्याकडून देण्यात येत आहे.
यावेळी मंचावर स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच गावकरी, महिला, युवक आणि क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आदर्श क्रीडा मंडळ,चुटूगुंटा यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.त्यांच्या नियोजनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.भविष्यातही अशाच भव्य स्पर्धांचे आयोजन करून ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.



