अहेरी-वेंकटापूर मार्गावर लालपरी कधी धावणार? विद्यार्थी,शेतकरी वाट पाहतायत
तात्काळ बससेवा सुरू करण्याची डॉ.अजय कंकडालवार यांची मागणी

गडचिरोली : अहेरी ते वेंकटापूर मार्गावरील बंद पडलेली बससेवा तात्काळ सुरू करण्यात यावी,अशी ठाम मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे केली आहे.
वेंकटापूर व परिसरातील गावांमधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून बससेवा बंद असल्यामुळे प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.विशेषतः शाळकरी विद्यार्थी,शेतकरी,जेष्ठ नागरिक आणि महिलांना अहेरी मुख्यालयात येण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण,शेतकऱ्यांचे व्यवहार आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
वेंकटापूर परिसरातील अनेक विद्यार्थी अहेरी येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात.बससेवा बंद असल्यामुळे त्यांना दररोज खाजगी वाहनाने शाळेत जावे लागत आहे.गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना रोज खाजगी वाहनाचा खर्च परवडणारा नाही.त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
गरीब विद्यार्थी दररोज खाजगी वाहनाने शाळेत जाणे शक्य होईल का? शासनाने याचा गांभीर्याने विचार करून तात्काळ बससेवा सुरू करावी,असे डॉ.कंकडालवार म्हणाले.
शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे रासायनिक खते,औषधे,बियाणे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी अहेरीला यावे लागते.बस नसल्यामुळे त्यांनाही खाजगी वाहनावर अवलंबून राहावे लागत असून आर्थिक भार वाढला आहे.बाजारहाट,दवाखाना, बँकेची कामे यासाठीही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामस्थांची भेट, कंकडालवार यांची तात्काळ दखल
वेंकटापूर व परिसरातील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी डॉ.अजय कंकडालवार यांची भेट घेऊन ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.ग्रामस्थांची कैफियत ऐकताच कंकडालवार यांनी तात्काळ अहेरी आगार व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी श्री.अंकुश कंडेलकर यांच्याशी संपर्क साधून बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली.
यावेळी श्री.कंडेलकर यांनी मागणीची दखल घेत,प्रथम या रस्त्याची पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर लगेचच बससेवा सुरू करण्यात येईल,असे आश्वासन दिले आहे.
लवकरच आपल्या गावात लालपरी येणार असल्याची बातमी पसरताच वेंकटापूर परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले आहे.ग्रामस्थांनी डॉ.अजय कंकडालवार यांचे आभार मानले आहेत.
बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची मोठी सोय होणार असून,अहेरी ते वेंकटापूर मार्गावरील दळणवळण पूर्ववत होईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



