जोगनगुडा शाळेत शिक्षक नाही, विद्यार्थ्यांचे नुकसान; अजयभाऊ कंकडालवार यांची तातडीने शिक्षक देण्याची मागणी

अहेरी : तालुक्यातील जोगनगुडा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता भासत असून,त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे.या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे.
जि.प.प्रा.शाळा जोगनगुडा,केंद्र उमानूर ता.अहेरी येथे इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतचे वर्ग भरतात.या शाळेत एकूण पटसंख्या ४० इतकी आहे.मात्र विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध शिक्षकांची संख्या अत्यंत अपुरी असल्याने एकाच शिक्षकाला सर्व वर्ग सांभाळावे लागत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयानुसार योग्य मार्गदर्शन मिळत नसून,त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
ग्रामस्थांनी दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी गट साधन केंद्र पंचायत समिती अहेरी येथील गट शिक्षणाधिकारी साहेब यांच्या सेवेशी अर्ज सादर केला.या अर्जात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून आमच्या शाळेला एक शिक्षक त्वरित उपलब्ध करून द्यावा,अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये,त्यांचे भवितव्य अंधारात जाऊ नये यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत,असे डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी म्हटले आहे.अतिरिक्त शिक्षकाची नियुक्ती झाल्यास विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल आणि पालकांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय नैताम,माजी उपसरपंच मरपल्ली कार्तिक तोगम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,आनंदराव भीमा तळांडी,सुजंगराव तुम्मा जनगम,बका अंकू कुमरे,राजीराव मल्ला करपेत,बापू हच्चा गांधारा,शंकर मल्ला बोरकुट, बापू येय्या गांधारा यांच्या सह आदी उपस्थित होते.



