कर्मवीर पोलीस कॉलनी शारदा मंडळ अहेरी येथे शारदा मातेची महाआरती उत्साहात संपन्न

अहेरी : कर्मवीर पोलीस कॉलनी शारदा मंडळ,अहेरी येथे काल शारदा मातेची महाआरती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात आयोजित करण्यात आली होती.नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वावर शारदा मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
या महाआरती कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार व अहेरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार दाम्पत्यांनी उपस्थित राहून शारदा मातेची विधिवत पूजा-अर्चना केली.यावेळी त्यांनी मातेची आरती देऊन दर्शन घेतले आणि उपस्थित भाविकांसोबत भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.
यावेळी बोलताना डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख,समृद्धी,शांती व उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना शारदा देवीकडे केली.तसेच जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी व सर्व नागरिकांच्या प्रगतीसाठी मातेच्या आशीर्वादाची कामना केली.
या कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,पोलीस कॉलनीतील नागरिक तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.ढोल-ताशाच्या गजरात व भजन-कीर्तनाच्या मंगलमय वातावरणात महाआरती संपन्न झाली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे डॉ.कंकडालवार दाम्पत्यांनी कौतुक केले.



