स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित कम्मासूर : विविध समस्यांसाठी ग्रामस्थांचे डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन

जिमलगट्टा : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात विकासाच्या दाव्यांना छेद देणारे वास्तव समोर आले आहे.जिमलगट्ट्यापासून अवघ्या 20 कि.मी.अंतरावर व पेठा पोलीस स्टेशन हद्दीपासून 3 कि.मी. अंतरावर असलेले कम्मासूर हे गाव स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही मूलभूत सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहे.रस्ते,पूल,पाणी अशा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या या गावातील नागरिकांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे आपल्या व्यथा मांडल्या.
कम्मासूर गावाला जोडणारा रस्ता नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत.पावसाळा सुरू झाला की संपूर्ण रस्ता चिखलमय होतो.गावातील नाल्यांवर पूल नसल्याने अहेरी किंवा आलापल्ली तालुक्याला जाण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करावी लागते.गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार,आजवर पूल नसल्याने नाला ओलांडताना दोन नागरिक वाहून गेले आहेत.
गावात रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने गंभीर आजारी रुग्णाला खाटेचा कावळ’ करून 3 कि.मी. पायी प्रवास करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते.अनेकदा वेळेत उपचार न मिळाल्याने वाटेतच रुग्णांचा प्राण जातो,अशी वेदनादायक माहिती ग्रामस्थांनी डॉ.अजयभाऊंना दिली.
कम्मासूर गावात वर्षभर पाणीटंचाई भासत असते.पावसाळ्यापूर्वी तातडीने नळ पाणीपुरवठा योजना सुरू करावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.90 टक्के आदिवासी बहुल असलेल्या या गावात आदिवासी संस्कृती जपण्यासाठी ‘गोटूल भवन’ बांधून द्यावे,अशी आग्रही मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारल्यानंतर डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही कम्मासूर सारखी गावे मूलभूत सुविधांपासून वंचित राहणे ही शासन-प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे.रस्ता,पूल नसल्याने नागरिकांचे जीव जातात ही गंभीर बाब आहे.मी स्वतः या प्रश्नी लक्ष घालून जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार आहे.नाल्यावरील पुलाचे बांधकाम,नळ योजना व गोटूल भवन मंजूर करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन,असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी कम्मासूर गावातील कृतिमंत पानेमवार, रघुपती आलाम, सुरेश बोडेंकी, रमेश येरमा, चुकय्या चिंता, समय्या मडावी, श्रीनिवास बोडेंकी, संतोष मडावी, कृष्णा सडमेक, सुनील आलाम यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



